जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील जैतापूर आगरवाडी येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर येथे गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. चैत्र शुद्ध नवमी शालिवाहन शके १९४८ या मंगल दिनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त श्री. नळेकर बंधू व आगर उन्नती मंडळ जैतापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सकाळी ठीक १०:३० वाजता नाटे येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. सौ. रमा प्रशांत ठाकूर यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार आहे. त्यांना श्री विनायक अनंत ठाकूर (हार्मोनीयम) आणि श्री नितीन लिंगायत (तबला) हे साथसंगत करणार आहेत. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसाच्या उत्तरार्धात, सायंकाळी ७:३० वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये मुंबई येथील श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाचे श्री भगवान लोकरे बुवा (शिष्य – श्री चंद्रकांत कदम बुवा) यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. त्यांना पखवाज वादक श्री अक्षय घाडीगावकर साथ देणार आहेत.
जैतापूर पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्तांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट आणि आगर उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












