राजापुरात श्री समर्थ स्थापित मारुती मंदिरात ‘नवीन मुखवटा सोहळा’ उत्साहात संपन्न

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील समर्थ नगर येथील ऐतिहासिक आणि श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री देव मारुती मंदिरात श्री मारुतीरायांच्या नवीन मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. राजापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

श्री समर्थ रामदास स्वामींनी समाजाचे आत्मबल, मनोबल आणि शारीरिक बल वाढावे, या उदात्त हेतूने ठिकठिकाणी मारुतीरायांची स्थापना केली. त्याच परंपरेतील राजापूरच्या समर्थ नगरमधील या जुन्या मुखवट्याच्या जागी आता नवीन मुखवटा तयार करण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘ मालपेकर ज्वेलर्स’ ते समर्थ नगर मारुती मंदिरापर्यंत या नवीन मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

दुसऱ्या दिवशी मुखवटा अग्न्युत्तारण विधी, तत्व होम, प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजा असे शास्त्रोक्त विधी पार पडले. तर २१ मार्च रोजी सकाळी लघुरुद्र आणि लघुरुद्र स्वाहाकार करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. रात्री आरती, मंत्रपुष्पांजली आणि ‘भोवत्या’ कार्यक्रमासह या सोहळ्याची सांगता झाली.

विशेष बाब म्हणजे, हा देखणा मुखवटा राजापूरचे प्रसिद्ध सुवर्णकार संदीप मालपेकर यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय (विनामूल्य) श्रद्धेपोटी बनवून दिला. त्यांच्या या कार्याचे भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे.

समर्थ नगर येथील ग्रामस्थ आणि राजापूरच्या भाविकांनी एकत्र येत हा सोहळा यशस्वी केला, ज्यामुळे परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.