खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेचे काम सुरू असताना महावितरणच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी केला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर टाकण्यात आलेल्या भूमिगत वीज केबल्स केवळ सात ते आठ इंच, तर काही ठिकाणी एक फूट इतक्या कमी खोलीवर टाकण्यात आल्याचे निदर्शनास येत असून, या केबल्सवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणात्मक कव्हरिंग किंवा गार्डिंग करण्यात आलेले नाही, अशी गंभीर बाब त्यांनी मांडली.
भूमिगत केबल योजना राबविताना महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेतली नसल्यामुळे आता त्याचा थेट फटका नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेच्या कामाला बसत आहे. विविध ठिकाणी उत्खनन करताना केबल्स आड येत असून, त्यामुळे कामात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, योजनेचे काम विलंबित होत असून त्याचा आर्थिक भुर्दंड संबंधित ठेकेदाराला सहन करावा लागत आहे.
सातपुते यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या केबल्स किमान तीन फूट खोलीवर टाकणे आवश्यक असताना त्या अत्यंत वरच्या स्तरावर टाकण्यात आल्या आहेत. योग्य पद्धतीने केबल टाकताना खाली लादी घालून, त्यावर केबल बसवून आणि त्यावर सुरक्षित गार्डिंग करणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात अशा कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्याचे दिसत नाही. तसेच, केबल्सची रचना आणि मार्गक्रमण याबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांनाही अचूक माहिती नसल्याने काम करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी केबल सरळ न नेता पुढे जाऊन गुंडाळून ठेवण्यात आल्याचेही आढळून येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यास ते पुन्हा योग्य पद्धतीने करून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, संबंधित ठेकेदारावर महावितरणकडून दंडात्मक कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.











