पडवे मेडिकल कॉलेजचा ऐतिहासिक सुवर्णक्षण

पहिल्या एम बी बी एस बॅचच्या १५० विद्यार्थ्यांचा भव्य ‘पदवीदान समारंभ’

खा.नारायण राणे, एसएसपीएमच्या अध्यक्षा सौ. नीलम राणे ,आमदार निलेश राणे,मत्स्यव्यवसाय बंदर विकास मंत्री नितेश राणे, डॉ.अजय चंदनवाले, यांच्यासह मान्यवरांची असणार उपस्थिती  

पडवे (प्रतिनिधी):सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील शिरपेचात , शनिवारी दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथील २०२० साली प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या १५०विद्यार्थ्यांचा ‘प्रथम पदवीदान समारंभ’ शनिवार दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कॉलेज कॅम्पसमध्ये अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. जिल्ह्यातूनच उच्चशिक्षित डॉक्टरांची निर्मिती करण्याचे खासदार नारायण राणे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्णत्वास जात असून, हा क्षण जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.२०२० साली प्रवेश घेतलेल्या या ‘पहिल्या बॅच’चा पदवीदान सोहळा हा केवळ कॉलेजसाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे.

 

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे स्वतः असणार आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, एसएसपीएमच्या अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष तथा आमदार निलेश राणे आणि राज्याचे बंदरे व बंदर विकास मंत्री तथा संस्थेचे सचिव नितेश राणे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वंदना गावपांडे व लाईफटाइम हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशुतोष पोतदार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहून भावी डॉक्टरांचे कौतुक करणार आहेत.

 

कोरोनाच्या संकटातून यशाच्या शिखराकडे

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी कोरोनाच्या संकटामुळे आव्हानात्मक होते. याच कठीण काळात या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपला वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सुरू केला होता. आज साडेपाच वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर हे विद्यार्थी ‘डॉक्टर’ म्हणून समाजाच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करत वैद्यकीय शिक्षणाची पहिली पाऊलवाट यशस्वी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा गौरव पाहण्यासाठी संपूर्ण पडवे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

 

कोकणच्या आरोग्य क्रांतीचा मैलाचा दगड

खासदार नारायण राणे यांनी कोकणातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ‘ एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल ची उभारणी केली. आज याच संस्थेतून पहिली डॉक्टरांची तुकडी बाहेर पडत असल्याने, हा केवळ संस्थेचाच नव्हे तर संपूर्ण कोकणच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आपल्या पाल्यांच्या हातातील पदवी आणि अंगावरचा तो ‘ग्रॅज्युएशन गाऊन’ पाहणे, हा पालकांसाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.