तब्बल २६ वर्षांनंतर भेट, जुन्या आठवणींना उजाळा !

साटवली विद्यालयाच्या १९९९ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली येथील रा. सि. बेर्डे माध्यमिक विद्यालय व कै. श्रुतिका यदुनाथ बेर्डे ज्युनिअर कॉलेज (सायन्स), साटवली च्या सन २९९९ च्या दहावी बॅचचा स्नेहसंमेलनाचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल २६ वर्षांनंतर झालेल्या या भेटीत प्रशालेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

तब्बल २६ वर्षांनंतर ही भेट घडल्याने उपस्थितांमध्ये विशेष आनंद आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.या सोहळ्यास सुमारे २५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. मुलींची संख्या तुलनेने कमी असली तरी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे त्या वेळचे शिक्षक उपस्थित राहू शकले नाहीत, याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र सध्याच्या शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला वेगळेच रंगतदार स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष महेश नारकर, सचिव आदेश आंबोळकर, मार्गदर्शक यासिनजी लांबे, मा. इर्शाद बरमारे, मा. युसूफ काझी, मुख्याध्यापक श्री .कदम तसेच शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण भारावून गेले. शिक्षक श्री .भालेकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर मुख्याध्यापक कदम यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले.

यावेळी १९९९ बॅचच्या वतीने राजन सुर्वे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंगेश डांगे यांनी शाळेप्रती असलेली भावना व्यक्त करत मनोगत सादर केले. महेश नारकर, आदेश आंबोळकर आणि शिक्षक भालेकर यांनीही आपले विचार मांडले.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले तसेच शाळेतील सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना ऍप्रॉन भेट देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गात जाऊन शालेय आठवणींना उजाळा दिला. या वेळी अनेकजण भावूक झाले होते. पुढे गप्पागोष्टी आणि भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

एकमेकांना भेटत, जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहसंमेलन सोहळा आनंदात पार पडला.