स्नेहबंध 2026 कॅरम स्पर्धेत राजाराम दरेकर विजेते

खेड (प्रतिनिधी) : पंचायत समिती खेड आयोजित ‘स्नेहबंध 2026’ उपक्रमांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कॅरम स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कळमणी खुर्द शाळेचे मुख्याध्यापक राजाराम दरेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात त्यांनी संयम, अचूकता आणि कौशल्यपूर्ण खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली. त्यांच्या या कामगिरीमुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खेड तालुका पंचायत समितीच्या सभापती आफिया परकार, उपसभापती सुनील मोरे तसेच गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
राजाराम दरेकर हे खेड तालुक्यात उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी अनेकांना यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. त्याचबरोबर ते एक उत्तम क्रिकेटपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वामुळे आणि कॅरम स्पर्धेतील यशामुळे खेड तालुक्यातील शिक्षक वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.