
ठेकेदाराला बजावली कारवाईची नोटीस : काळ्या यादीत टाकणार
उखडलेली खडी दूर करून तात्पुरती डागडुजी करण्याचे आदेश
पावसाळ्यानंतर संपूर्ण काम नव्याने करून घेणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी बेळगाव या राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचे मे महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर येथील डी आर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदरचे काम पूर्णपणे नादुरुस्त झाले असून डांबरच वाहून गेल्याने अनेक ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली असून सद्यस्थितीत या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी तसेच पावसाळ्यानंतर डांबरीकरणाचा उखडलेला संपूर्ण थर पुन्हा करून देण्यात यावा असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित ठेकेदारास या विभागात भविष्यात पुन्हा कोणतेही काम देणार नसल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी स्पष्ट केले आहे.
सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना हे काम योग्य पद्धतीने होत नसलेबाबत तसेच डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. संबंधित ठेकेदारालाही बांधकाम विभागाकडून तशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र रहदारीचे कारण पुढे करत त्याने त्या गोष्टीकडे टाळाटाळ करीत काम उरकण्यात धन्यता मानली होती. त्यामुळे पहिल्याच पावसात बुर्डीपूल ते धवडकी पर्यंत संपूर्ण रस्त्याचा बीएमचा थर उखडून गेला आहे. अनेक ठिकाणी खडीवर आली असून काही ठिकाणी अक्षरशः खडी डांबरासहित वाहून जात खालील थर दिसून येत आहे.
त्यामुळे या भागात दुचाकी व अन्य वाहनांचे वारंवार अपघात होत असून याबाबत दैनिक प्रहार मधून आवाज उठविण्यात आला होता. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेतली असून संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली आहे. ४ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने नोटीस बजावली तर बांधकाम विभागाकडून ६ जुलै रोजी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २६ जुलै रोजी पुन्हा एकदा त्याला नोटीस बजावून कारवाईचे संकेत देण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने सद्यस्थितीत कामगार लावून उकडलेली खडी बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे. तर पावसाचा जोर कमी झाल्यावर पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्यात येतील अशी माहिती त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे.
मात्र, संबंधित ठेकेदाराचे संपूर्ण बिल रोखण्यात आले असून पावसाळ्यानंतर उकडलेला संपूर्ण रस्ता त्याच्याकडून पूर्णपणे नव्याने करून घेतला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली आहे. तसेच या विभागात भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारचे काम दिले जाणार नाही असे सांगत त्याला या विभागासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी दिलेल्या नोटिसीनुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी बेळगांव रस्ता रा.मा. १८० कि.मी. ३०/०० ते ३८/०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाचा मक्ता संदर्भिय कार्यारंभ आदेशान्वये आपणांस प्रदान करणेत आला होता. त्याअनुषंगाने सदर रस्त्याचे बी. एम. चे काम आपणांकडून माहे मे २०२३ मध्ये करणेत आले होते. सदर काम करताना बी. एम. साठी आवश्यक असणाऱ्या ग्रेडेशन, रोलींग व्यवस्थित झालेले नाही. याबाबत आपल्या साईट इंजिनिअर यांना कामाच्या जागेवर काम करीत असताना सूचना दिल्या होत्या. परंतु काम करताना दिलेल्या सुचनांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे पावसाळयामध्ये सदर बी. एम. चे काम बऱ्याच ठिकाणी अत्यंत खराब झाले असून अपघातप्रवण परिस्थिती निर्माण झाली आहे ही बाब गंभीर आहे.
सद्य:स्थितीत सदर रस्त्यावरील बी. एम. ची खडी संपूर्ण निघालेली असून रस्त्यावर इतरत्र संपुर्ण विखुरलेली असल्यामुळे गाडया घसरुन अपघात होत आहेत. तरी सदरील खडी त्वरीत बाजूला करणेबाबत आपणास संदर्भ क्रमांक २ व ३ अन्वये कळविण्यात आलेले होते. परंतु आपणाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही ही बाब गंभीर आहे.
या कार्यालया मार्फत तात्पुरत्या स्वरुपात बाहेरील मजूर लावून खडी बाजूला केली होती. परंतु आत्ता सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी बाहेर आलेली आहे. त्यामुळे दिनांक २२ जुलै रोजी दोन गाडयांचा अपघात झालेला आहे. आपण याबाबत योग्यती कार्यवाही न केल्यास पुन्हा पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण केलेल्या कामामुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या कंपनीची राहील याची नोंद घेण्यात यावी.
तसेच सदर रस्त्यावरील खड्डे त्वरीत भरुन घ्यावेत आणि रस्ता वाहतुकीस अद्ययावत ठेवावा. तसेच सदर दुरुस्तीची कार्यवाही करण्यास विलंब करु नये. अन्यथा नादुरुस्त कामामुळे काही दुर्घटना किंवा अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व निविदा शर्तीप्रमाणे आपणावर योग्यती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा संबंधित ठेकेदाराला नोटिसीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे.












