भंडारी फाऊंडेशनतर्फे १० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; ८ संघ भिडणार!

रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यप्रेमींसाठी मेजवानी ठरणाऱ्या ‘भंडारी फाऊंडेशन पुरस्कृत जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६’ चे आयोजन शुक्रवार, दिनांक १० एप्रिल रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत रंगणार असून, एकूण ८ नाट्यसंघांनी यात सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन भंडारी फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ९ वाजता होईल. पहिली एकांकिका सकाळी ९.३० वाजता सादर होणार असून ‘श्रीमान भागोजीशेठ कीर विधी विद्यालय, रत्नागिरी’ ही संस्था ‘पैठणी’ (लेखक: प्रथमेश पवार) ही एकांकिका सादर करेल. त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘मंगलमूर्ती फाऊंडेशन, पाली’तर्फे ‘पॅडल’ (लेखक: अजय पाटील) आणि दुपारी १२.३० वाजता ‘नाट्यशोध, रत्नागिरी’तर्फे ‘थडगे’ (लेखक: कृष्णा वाळके) या एकांकिका सादर केल्या जातील.

दुपारच्या सत्रात २ वाजता ‘राजयोग कलामंच, मुचरी (ता. संगमेश्वर)’ यांची ‘कुबडा तू बडा’ (लेखक: प्रा. अवधूत भिसे) ही चौथी एकांकिका सादर होईल. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता ‘मधु मिलिंद प्रतिष्ठान, रत्नागिरी’ची ‘प्रेम की यातना’ (लेखक: दिपक शिंदे) आणि सायंकाळी ५.४५ वाजता ‘सुमती थिएटर्स, रत्नागिरी’ची ‘लज्जा द्यावी सोडून’ (लेखक: अजय पाटील) ही एकांकिका सादर होणार आहे.

स्पर्धेच्या शेवटच्या सत्रात रात्री ७.१५ वाजता ‘रसिक इंद्रधनु प्रतिष्ठान, पानवळ’तर्फे ‘रसिक’ (लेखक: योगेश सोमण) ही सातवी एकांकिका सादर होईल. स्पर्धेची सांगता रात्री ८.४५ ते १० या वेळेत ‘एम. ए. क्रिएशन, रत्नागिरी’ यांच्या ‘खरा सोबती’ (लेखिका: सौ. मयुरा डोमणे) या एकांकिकेने होईल. जिल्हाभरातील विविध नाट्यसंस्थांच्या उत्कृष्ट कलाकृती एकाच छताखाली पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.