रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या वतीने रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शहरातील थिबापॅलेस मार्गावरील जयेश मंगल पार्क येथे ‘श्रावणधारा’ या स्वरचित काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या या भूमीतून अनेक साहित्यिक उदयास आले . त्यांनी आपल्या साहित्यामधून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांची काव्य परंपरा कायम जपण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद दरवर्षी ‘श्रावणधारा’ हा स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करून रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ व नवोदित कविना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते व साहित्य चळवळ अखंड चालू ठेवण्याचे काम करत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेने दि. ६ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यासाठी पाऊस व श्रावण हे दोन विषय देण्यात आले आहेत. कवीने या दोन पैकी कोणत्याही एका विषयावर स्वरचित कविता सादर करायचे आहे. सहभागी कवींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. हे काव्य वाचन, युवा गट आणि खुला गट अशा दोन गटात होणार असून ३५ वर्षांपुढील खुला गट असेल. तर यापुर्वी नोंदणी झालेल्या कवीनांच कार्यक्रमात कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आकाशवाणीच्या निवृत्त निविदिका सौ.निशा काळे उपस्थित राहणार आहेत..’श्रावणधारा’ कार्यक्रमाला सर्व कवी प्रेमींसह रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्षा सौ.तेजा मुळ्ये , सचिव श्री.सुनील चव्हाण यांनी केले आहे.











