राजापूर शहरात वाहतुक कोंडीचा प्रश्न जटील, पोलीस प्रशासन हतबल
राजापूर | प्रतिनिधी: एकीकडे तीव्र उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे शहरातील जवाहर चौक ते तालीमखाना या मुख्य रस्त्यावर जवाहर चौकते नगरवाचनालय रस्त्यादरम्यान होणारी वाहतुक कोंडी यामुळे वाहनचालक, नागरिक, पादचारी पुरते त्रस्त झाले आहेत. या परिसरात बेशिस्तपणे पार्क केल्या जाणाऱ्या गाडयांमुळे ही वाहतुक कोंडी नित्याचीच झाली असून शहरातील ही वाहतुक कोंडी, बेंशिस्त वाहन पार्किंग याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन मात्र जणू हतबल असल्यासारखीच परिस्थिती आहे अशीच राजापूर पोलीसांची अवस्था आहे. कधी कधी तब्बल अर्धा ते एक तास या भागात वाहतुक कोंडी होत असताना पोलीस प्रशासन त्याची दखलच घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या वाहतुक कोंडीत वयोवृध्द नागरिक, महिला आणि रूग्णांचे जीव गुदमरत असून याला जबाबदार कोण? आणि या बेशिस्त वाहन पार्किंगला आळा कोण घालणार?असा सवाल राजापूर शहरवासीयांतुन उपस्थित केला जात आहे. बुधवारी १५ एप्रिल रोजी तीन ते चार वेळा जवाहर चौक ते नगर वाचनालय रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल अर्धा ते एक तास अनेकजण वाहतुक कोंडीत अडकले होते.
राजापूर शहरातील वाहतुकीची कोंडी ही समस्त नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र स्थानिक पातळीवर नगर परिषद व पोलीस प्रशासन यावर उपायोजना करण्याबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. तालीमखाना ते जवाहर चौक हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी की वाहने पार्क करण्यासाठी असा प्रश्न पडावा अशी या रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहने पार्क केली जात आहेत. राजापुर पोलीस स्थानकासमोर तर पोष्ट कार्यालय ते पंचायत समितीकडे जाणारा रस्ता हा जणू पार्किंग झोनच आहे की काय असा प्रश्न पडतो. तर शहरात सर्वाधिक वाहतुक कोंडी ही जवाहर चौक ते नगर वाचनालय रस्ता या भागात होते. या भागात बेशिस्तपणे लावली जाणारी वाहने हेच मुख्य वाहतुक कोंडीचे कारण आहे. वारंवार या ठिकाणी वाहतुक कोंडी होते, मात्र याचे कुणालाच काही देणं घेणं नसल्यासारखी अवस्था आहे. या परिसरात असलेल्या एका दुकानासमोर तर अत्यंत बेशिस्त पध्दतीने वाहनें लावली जातात,. तर माल उतरण्यासाठी बाहेरून येणारे मोठे ट्रक व टेम्पो देखील लावलेले असतात, त्यामुळे आणखीच वाहतुक कोंडीत भर पडले. मात्र याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. पोलीस प्रशासन या व्यावसायिकावर एवढे मेहरबान का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजापूर शहर बाजारपेठेत तर दोन्ही बाजुला गाडया पार्क केल्याचे दिसून येते, पोलीसांची गाडीही बाजारपेठेत फिरू शकत नाही अशी अवस्था आहे. मात्र तरीही नगर परिषद व पोलीस प्रशासन यावर कोणतीच भूमिका घेत नाही. तर बाजारेपठेतुन बाहेर पडण्यासाठी असलेल्या छोटया बोळ वजा रस्त्यांवरही राजरोसपणे पार्किंग केलेले पहावयास मिळत आहे. तीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज रोडवर देखील आहे. मात्र राजापुरात कुणीही कसेही वागा, कशाही गाडया लावा तुंम्हाला कोणी विचारणार नाही अशीच सध्या अवस्था आहे.
टोचन व्हॅनचा वापर करून कारवाईची गरज
राजापुरातील या बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालावयाचे म्हटले तर नक्क्कीच पोलीस प्रशासन घालु शकते. मात्र त्यासाठी पोलीसांनी टोचन व्हॅनच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बेशिस्त वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांच्या गाडयाच या टोचन व्हॅनच्या सहाय्याने उचलाव्यात व कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. तरच भविष्यात या बेशिस्तीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. मात्र यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी असणेही महत्वाचे आहे तरच हे होऊ शकते.











