साटवली जि.प गटात दर सहा महिन्यांनी आढावा बैठक घेणार

लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील- जि प सदस्य – सौ.लीला घडशी

लांजा (प्रतिनिधी) :ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यांच्यासहित साटवली जि.प.गटातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठीच दर सहा महिन्यांनी आढावा बैठक घेणार असल्याची ग्वाही, साटवली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. लीला घडशी यांनी गोळवशी येथे दिली.
साटवली जिल्हा परिषद गटातील लोकांचे आणि विशेषता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठक आज गोळवशी येथे पार पडली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य लीला घडशी बोलत होत्या. या आढावा बैठकीला पंचायत समिती सभापती सौ.मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, गोळवशी सरपंच आधी उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये साटवली जि प गटातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न यामध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या विषयासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईच्या दृष्टीने जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे लीला घडशी यांनी सांगितले. तर लोकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टीने साटवली उपकेंद्रा च्या अधिकाऱ्यांना देखील आवश्यकता सूचना देण्यात आल्या.
शासनाने महिलांसाठी देखील विविध योजना अमलात आणलेल्या आहेत. या योजनांचा देखील साटवली जि प गटातील प्रत्येक लाभार्थी महिलेला लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपले निश्चितच प्रयत्न राहतील. किंबहुना या गटातील महिला या आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होतील यावर देखील आपला आगामी काळात भर राहणार असल्याचे लीला घडशी यांनी सांगितले.
आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली दर सहा महिन्यांनी आपण आढावा बैठक घेणार असल्याचे लीला घडशी यांनी स्पष्ट केले. या आढावा बैठकीला साटवली जि प गटातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.