IPL 2026: RCB vs GT सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंच्या लढती ठरणार निर्णायक

प्लेऑफच्या शर्यतीत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची लढत
कोहली, गिल ते बटलर; स्टार खेळाडूंवर सर्वांची नजर

IPL 2026 मध्ये आज RCB आणि GT यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मागील पराभवानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या सामन्यात काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या वैयक्तिक लढती निकालावर मोठा प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या खास भिडतींकडे लागले आहे.


नवी दिल्ली : IPL 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभवानंतर आज मैदानात उतरणार आहेत. RCB ला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला, तर GT चा मुंबई इंडियन्सविरुद्ध 99 धावांनी पराभव झाला. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

RCB सध्या सहा सामन्यांतून 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर GT सहा सामन्यांत 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB चा हंगामातील शेवटचा होम सामना असल्याने संघ विजयाने शेवट करण्याचा प्रयत्न करेल.

या सामन्याआधी काही महत्त्वाच्या खेळाडूंमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारने शुभमन गिलला 11 डावांत चार वेळा बाद केले असून गिलचा त्याच्याविरुद्ध स्ट्राइक रेट कमी राहिला आहे. विराट कोहलीचा कागिसो रबाडाविरुद्ध रेकॉर्डही कमकुवत असून त्याने सात डावांत फक्त 36 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, जोस बटलरने जोश हेझलवूडविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली असून त्याचा स्ट्राइक रेट प्रभावी आहे. RCB कर्णधार रजत पाटीदार उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो राशिद खानविरुद्ध मधल्या षटकांत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तसेच, फिल सॉल्ट आणि मोहम्मद सिराज यांच्यातील लढतही रोमांचक ठरणार आहे.