खेडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या विचारांशी ठाम !

अमित कदम आणि कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेत माहिती

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या विचारांशी ठाम असून नुकतीच जी राष्ट्रवादीत दुफळी झाली आहे. ती कार्यकर्त्यांत झाली नसून फक्त नेते दुसरीकडे गेले आहेत. बाकी सर्व शरद पवार यांचेच नेतृत्व मानणारे कार्यकर्ते तिथेच आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खेड तालुका सरचिटणीस अमित तुकाराम कदम यांनी खेड येथील उमेश कदम यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केले. यावेळी उमेश कदम, गणेश कदम, विनायक निकम, प्रदीप घाणेकर, अभिजित चाळके, रविंद्र भोसले, बाबाराम (मामा) तळेकर, वसंत गुरव , सरवर कुडुपकर, सुरज जोगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मानणारा मोठा गट राष्ट्रवादी पक्षात सामील झाला. खेडमध्ये सुध्दा अनेकजणांनी शरद पवारांचे नेतृत्व मानून त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील झाले. पक्षबांधणीसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आ. भास्कर जाधव व माजी आमदार संजय कदम राष्ट्रवादीत आल्यावर पक्षाला चांगली उभारी मिळाली होती. मात्र या दोघांनी राष्ट्रवादी पक्षाशी फारकत घेतल्यानंतरही शरद पवार यांचे कार्यकर्ते डगमगले नाहीत तर ते एकनिष्ठच राहिले.त्यावेळी खरेतर जिल्हाध्यक्षानी कार्यकर्त्यांची सभा घेऊन पक्षाची विचारधारा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर ता. २ जुलै रोजी राष्ट्रवादि पक्षातच दुफळी झाली,त्यावेळी जिल्हाध्यक्षानी सभा घेऊन कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली पाहिजे होती,मात्र त्यांनी तसे न करता स्वतःच शरद पवारांचे नेतृत्व झिडकारून दुसरे नेतृत्व स्विकारले आहे. आम्हाला याबाबत काहीही म्हणावयाचे नसून,आम्ही सामान्य कार्यकर्ते शरद पवारांच्या विचाराशी ठाम आहेत आणि त्यांचेच नेतृत्व मान्य करून आम्ही यापुढील सर्व निवडणुकांना सामोरे जाऊन आमची ताकद दाखविणार आहोत.

आम्ही कुणाच्या पराभवासाठी प्रयत्न करणार नसून आम्ही स्वत: जिंकण्यासाठी व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्वच उपास्थित कार्यकर्तानी सांगितले.