
रत्नागिरी : महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे दिलेले कोणतेही काम पूर्ण योगदान देऊन करत असतात. महसूल सप्ताहातही सर्वांनी चांगले काम केले आहे. आपण असेच काम करत, कामामध्ये सातत्य ठेवाल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाचा आज सांगता समारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी जास्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे प्रमाणिकपणे व उत्स्फूर्तपणे काम करीत असतात. महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहातही त्यांनी चांगले काम केले. एकमेकांमध्ये समन्वय ठेवून सांघिक काम केल्याने ते शक्य झालं. महसूल सप्ताहात जिल्ह्याने केलेल्या कामाचे, नियोजनाचे विभागीय आयुक्तांनी कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यातही असेच काम करालं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री महोदय सप्ताहामध्ये दोनवेळा कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी श्रीमती. साठे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.












