अनेक घरांचे, गोठ्यांचे नुकसान : आंबा पिकालाही फटका..
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात गुरुवारी जोरदार चक्रीवादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी घरांचे, गोठ्यांचे तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. गुरुवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या चक्री वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले.
या वादळामुळे आखवणे-भोम पुनर्वसन गावठाण येथील आकाराम यशवंत नागप, प्रकाश तुकाराम पडवळ आणि रविकांत दत्ताराम नागप यांच्या घरांच्या छपरांचे नुकसान झाले. मांगवली राणेवाडी येथे नंदकुमार राणे यांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच नाधवडे येथील रवींद्र खांडेकर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, कोकिसरे रेल्वे फाटक परिसरात वडाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने कोकिसरे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
सध्या तालुक्यात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना या वादळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटलेले असताना या वादळामुळे उरल्यासुरल्या आंबा पिकाचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
वादळचा फटका वीज वितरण कंपनीला बसला असून मांगवली येथे वीज खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होता.













