नगरसेवक सुधीर आरीवडेकर धावले मदतीला
सावंतवाडी | प्रतिनिधी : पावसामुळे झालेल्या निसरड्या रस्त्यावर घसरून लॉरेन डिसोझा हे गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुधीर आरीवडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी डिसोझा यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गेल्या दोन दिवसांपासून सावंतवाडीत पावसाने हजेरी लावली आहे. राजवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात जांभळाची झाडे असून, पावसाळ्यामुळे जांभळे आणि त्यांच्या साली रस्त्यावर पडत आहेत. पावसामुळे या सालींचा चिखल होऊन रस्ता कमालीचा निसरडा झाला आहे. आज सायंकाळी ६ वाजता लॉरेन डिसोझा हे या भागातून जात असताना त्यांचा पाय जांभळाच्या सालीवरून घसरला आणि ते जोरात आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला, तसेच हात-पायही मोठ्या प्रमाणात खरचटले आहेत.
काल सायंकाळी याच परिसरात निसरड्या रस्त्यामुळे चार छोटे-मोठे अपघात झाले होते. आम्ही सकाळीच नगरपालिकेला याबाबत सूचना दिली होती, तरीही साफसफाई करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच आज डिसोझा यांना गंभीर दुखापत झाली आहे,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केला.
पाण्याचा फवारा मारून रस्ता साफ करण्याची मागणी
राजवाडा हा मुख्य रहदारीचा भाग असून येथे पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात जांभळाच्या साली आणि फळांमुळे रस्ता ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने तात्काळ टँकरच्या सहाय्याने किंवा हायप्रेशर स्प्रेने पाणी मारून हा रस्ता स्वच्छ करावा, जेणेकरून भविष्यातील मोठे अनर्थ टाळता येतील, अशी आग्रही मागणी आता नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.













