देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा

बापर्डे ते विठ्ठलादेवीपर्यंत मोठी पडझड; लाखोंचे नुकसान, प्रशासनाकडून तातडीने
पंचनाम्यांचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न – तहसीलदार रमेश पवार

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे अनेक गावांना मोठा फटका बसला. बापर्डे, सौंदाळे, फणसगाव, मुटाट, विठ्ठलादेवी, गोवळ, तांबेवाडी, सोमलेवाडी आदी भागांत झाडे उन्मळून पडणे, घरांची छपरे उडणे, सिमेंट पत्रे तुटणे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. या संपूर्ण नुकसानीची पाहणी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे केली.

तहसीलदार रमेश पवार यांनी सांगितले की, या वादळी वाऱ्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सर्व संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवगड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान अचानक जोरदार वादळ सदृश्य स्थिती मुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, घरांच्या छपरांवरील पत्रे उडाली, शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले. गोवळ तांबेवाडी येथे शाळेचे छप्पर उडून जवळील एका वृद्ध महिलेच्या घरावर कोसळले. मात्र सुदैवाने त्या महिलेच्या घराचा दुसरा भाग बाधित झाल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार बापर्डे ते सौंदाळे या संपूर्ण परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात बापर्डे ,गोवळ, फणसगाव, सौंदाळे, गोवळ तांबेवाडी, सोमलेवाडी आणि विठ्ठलादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी केळीच्या बागांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

घालवली ब्रह्मदेव मंदिर परिसरातील रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या गाळामुळे वाहतुकीस अयोग्य झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पावसापूर्वी वाहतुकीस योग्य बनविण्याच्या सक्त सूचना संबंधित ठेकेदाराला देणार आ
असल्याची माहिती सभापती गणेश राणे यांनी दिली.

काही ठिकाणी घरांची संपूर्ण छपरे उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने अनेक घरांमध्ये त्यावेळी कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही गणेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान, गोवळ परिसरातील आश्विन बाबाजी सावंत, विष्णू बाबाजी घाडी, मधुकर शंकर माळकर, संदीप विनायक माळकर, निर्मिला शिवराम तांबे आणि रघुनाथ गोपाळ मोरे यांचे नुकसान झाले आहे. तसेच फणसगाव येथील मोहन वासुदेव पालकर, दिलीप पांडुरंग नर, रुक्मिणी अंबाजी गुरव, यशवंत राजाराम महाडिक, महेंद्र नारायण नरसाळे सत्यवान भास्कर जगताप, प्रकाश रामचंद्र नरसाळे यांनाही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.

कुणकवण परिसरातही यशवंत सिताराम विचारे, अर्जुन राजाराम जनक, महादेव शिवराम राणे, अनंत सखाराम देवळेकर , शशिकांत आबा तोरस्कर यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार रमेश पवार यांनी सर्व पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून शासन दरबारी अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तहसील कार्यालयात नोंद झालेल्या आकडेवारीपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचे दिसून आल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

या पाहणी दौऱ्यात सभापती गणेश राणे उपसभापती अमोल लोके पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी , संबंधित प्रशासकीय अधिकारी कधी उपस्थित होते.