▪️भक्तीचा ‘ ग्लोबल ‘ अवतार
मसुरे | झुंजार पेडणेकर
कोकणच्या मातीतील भजनाचा गोडवा आणि येथील ‘डबल बारी’ म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी पर्वणीच! याच भजनाच्या दरबारात नुकताच एक असा प्रसंग घडला, ज्याने सातासमुद्रापारच्या पाहुण्यांनाही ‘हरी ‘ नामात नाचायला लावले. भजनात एकदा का माणूस शिरला की तो स्वतःला विसरतोच. पण, हाच नाद आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालू लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील आरोंदा गावात रंगलेल्या भजनाच्या ‘डबल बारी’मध्ये बलुचीस्तान येथील एका विदेशी जोडप्याने चक्क स्टेजवर एन्ट्री घेत ‘हरे कृष्ण’चा जयघोष केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, “भक्तीला सीमा नसतात” याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
▪️ गजर रंगात आला अन…
वेंगुर्ले तालुक्यातील सातेरी भद्रकाली मंदिर आरोंदा येथे 8 मे रोजी रात्रौ 9 वाजता कुडाळ – वर्दे येथील प्रसिद्ध भजनी बुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि कुडाळ -पोखरण येथील प्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम या दोन भजनी बुवांमध्ये हा सामना रंगला होता. भजनाची रंगतदार ‘डबल बारी’ सुरू होती. दोन्ही बाजूंचे बुवा एकमेकांवर शब्दांच्या कोटी करत असतानाच, तिथे एक विदेशी जोडपे कुतूहलाने आले. सुरुवातीला लांबूनच हे भजन पाहणारे ते जोडपे हळूहळू बुवा गुंडू सावंत यांच्या भजनाच्या तालावर डोलू लागले. ‘हरे रामा, हरे कृष्णा’ या नामाचा गजर सुरू होताच, त्यातील परदेशी व्यक्तीचा उत्साह अनावर झाला. बलुचीस्तान येथील ती व्यक्ती चक्क स्टेजवर गुंडू बुवांच्या बाजूला माईक घेऊन उभी राहिली.
▪️चक्क स्टेजवर चढून धरला सूर!
केवळ दुरून दाद देऊन तो पाहुणा थांबला नाही, तर तो थेट स्टेजवर पोहोचला. भजनी बुवा गुंडू सावंत यानीही मोठ्या मनाने त्याचे स्वागत केले आणि हातात माईक दिला. मग काय? त्या विदेशी पाहुण्याने पूर्ण ताकदीने आणि तितक्याच भक्तीभावाने “हरे रामा.. हरे कृष्णा..” चा जयघोष अगदी तालासुरात आणि विशेष म्हणजे पेटी वरील चालू गजराच्या पट्टीमध्ये सुरू केला. समोर बसलेले शेकडो भजनप्रेमी क्षणभर थक्क झाले आणि नंतर त्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या ‘भजनी बुवा’ला दाद दिली.
▪️भजन क्षेत्रात चर्चेची ‘वारी’
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटकरी यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “आमच्या कोकणी संस्कृतीची हीच तर ताकद आहे,” अशी भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.भजनी बुवा गुंडू सावंत यांच्या दातृत्वाचेही कौतुक होत आहे, ज्यांनी एका अनोळखी विदेशी पर्यटकाला थेट स्टेजवर संधी देऊन भारतीय पाहुणचाराचा आदर्श ठेवला.
▪️विठू नामाचा गजर झाला ग्लोबल
“संगीत आणि भक्ती ही जगाची सामायिक भाषा आहे. त्या विदेशी पाहुण्याने जेव्हा माईक हातात धरला, तेव्हा तो परदेशी वाटलाच नाही, तो फक्त एक भक्त त्याच भजनी मंडळातील सदस्य वाटला. कोकणच्या या मातीने आजवर अनेक कलाकार, भजनीबुवा घडवले, पण एका परदेशी माणसाला ‘भजनी बुवा’च्या थाटात गाताना पाहणे, हा अनुभव भजनप्रेमींसाठी कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला आहे. भक्तीला ना जात असते , ना देश, ना भाषा….. असतो तो फक्त शुद्ध भाव!खरोखरच त्या विदेशी पाहुण्याच्या रूपाने कोकणच्या भजनाला आरोंध्यात एक जागतिक चाहता मिळाला.विठूनामाचा हा गजर आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला आहे, हेच या घटनेतून सिद्ध झाले!












