पीएचडी धारक सभासदांचा सावंतवाडी तालुका वकील संघटने कडून सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या सभासद सौ. अश्विनी मेघनाथ लेले, सौ. अस्मिता अच्युत सावंत-भोसले व सौ. शितल अभिजीत टिळवे यांनी विविध विषयावर विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी मिळविलेली आहे त्याकरिता त्यांचा सावंतवाडी वकील संघटनेतर्फे शुक्रवार २१ रोजी सावंतवाडी वकील संघटनेच्या वकील कक्षात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सौ. अश्विनी लेले यांनी २०२४ मध्ये “कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणाचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थान येथून पीएचडी केलेली आहे. त्यांचा सत्कार सावंतवाडी बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सौ. अस्मिता अच्युत सावंत-भोसले यांनी “किशोरवयीन गुन्हेगारीचा सखोल अभ्यास” या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर प्रबंध सादर करून भोपाळ येथील सेज विद्यापीठातून पीएचडी मिळवलेली आहे. त्यांचा सत्कार सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांचे हस्ते करण्यात आला.

तसेच सौ. शितल अभिजीत टिळवे यांनी “महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील बालदत्तक प्रक्रियेचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर भोपाळ येथील सेज विद्यापीठातून पीएचडी संपादन केलेली आहे. त्यांचा सत्कार सावंतवाडी बारच्या ज्येष्ठ महिला सभासद ॲड. नीता सावंत कविटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या तिन्ही महिला सभासदांनी विद्यावाचस्पती ही पदवी मिळवून सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या प्रतिमेत मानाचा तुरा रोवलेला आहे. त्यांनी मिळवलेले यश हे बाकीच्या सभासदांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन देणारे आहे. अशा शब्दात ॲड. दिलीप नार्वेकर यांनी त्यांचे कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना तिन्ही उत्सवमुर्तीनी आपल्या घरचा सत्कार आहे आणि त्याबद्दल सावंतवाडी वकील संघटनेचे आभार व्यक्त केले. ॲड. डॉ. अस्मिता सावंत यांनी पीएचडी करण्यासाठी काय काय प्रक्रिया आहे याची थोडक्यात पण पुरेशी माहिती दिली. आता ह्या तिन्ही असामी नवीन प्रबंध लिहिणाऱ्याना मार्गदर्शक म्हणून काम पाहू शकतात.

या कार्यक्रमास सावंतवाडी वकील संघटनेचे ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. अनिल केसरकर, ॲड. माधवी पेंडुरकर, ॲड. धनंजय पेंडूरकर, ॲड. तृप्ती सावंत, ॲड. वामन निर्गुण, ॲड. रत्नाकर गवस, ॲड. समीर वंजारी, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. विजय शंभरकर, ॲड. पूजा ओटवणेकर, ॲड. वर्षा गावकर, ॲड. प्रिया भावे, ॲड. मेघा परब, ॲड. बकले, लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य सौ. वेंगुर्लेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. सुखानंद सावंत, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, इत्यादी सावंतवाडी वकील संघटनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. स्वप्निल कोरगावकर यांनी केले तर आभार सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.