सामाजिक कार्याचे नगराध्यक्षांकडून कौतुक : सहकार्याचे आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचे आज अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्गच्या वतीने पुष्पगुच्छ आणि भारतमातेची प्रतिमा देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी त्यांच्या निवडीचा आनंद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या छोटेखानी सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी अभिनव फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेतली. “समाजातील गरजू घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे प्रशासनालाही बळ मिळते. अभिनव फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून सामाजिक कामात पूर्ण सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले आणि नवनिर्वाचित युवा नगरसेवक प्रतीक बांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते. अभिनव फाउंडेशनच्या वतीने अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, राजू केळूसकर, जितेंद्र मोरजकर आणि विनायक रांगणेकर यांनी नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान शहराच्या विकासासोबतच सामाजिक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. युवराज्ञींच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.












