बसस्थानकाच्या नव्या इमारतीमध्ये शौचालय नाही
डासांचा उपद्रव वाढला, नागरिक हैराण
लांजा( प्रतिनिधी) :लांजा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या शौचालय आणि मुताऱीची टाकी ही ओव्हरफ्लो होऊन त्यातील घाणीचे पाणी सर्वत्र वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास जवळच्या नागरिकांना होत आहे.त्यामुळे याबाबत तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र या बस स्थानकातील पूर्वीच्या शौचालय आणि मुताऱ्यांची अतिशय दुरवस्था झाल्याने माजी आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन शौचालय आणि मुतारीची इमारत बांधण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात लांजा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले निर्मल शौचालय करण्यात आल्यानंतर लांजा बस स्थानकातील शौचालय आणि मुतारीवरच लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी या शौचालयाची टाकी ओव्हरफ्लो हैऊन सर्वत्र घाणीचे पाणी हे इमारतीच्या बाजूला वाहत आहे. त्यामुळे या बस स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या निवासी तसेच व्यापारी संकुलातील इमारतीमधील नागरिक, व्यापारी वर्ग यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या घाणयुक्त पाण्यामुळे डासांचा देखील उपद्रव वाढला असून येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवूनच या ठिकाणी प्रवेश करावा लागतो. इतकी बिकट अवस्था या ठिकाणी दिसून येत आहे.
सद्यस्थितीत लांजा बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. मात्र नवीन इमारतीच्या कामांमध्ये शौचालय व मुतारीचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. त्यामुळेच सदर शौचालयाच्या टाकीच्या दुरुस्ती बाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि येथील नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे.













