शहरात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र, टँकरच्या माध्यमातुन साठवण टाकीत पाणीसाठा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय

नगराध्यक्षा एड. हुसनबानू खलिफे यांची माहिती
पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना २४ तास अलर्ट रहाण्याचे आदेश
राजापूर (प्रतिनिधी): वाढत्या उष्ण तापमानामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली व शिळ या दोन्ही प्रमुख पाणीपुरवठा स्त्रोतांतील पाणीसाठयात घट झाली आहेत. त्यातच कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाचे काम सुरू असताना पाणीपुरवठा वाहिनी फुटल्याने कोदवलीकडून येणाऱ्या पाणीपुरवठयात व्यत्यय निर्माण झाला आहे. तर शिळ कडून येणाऱ्या पाणीपुरवठयातही विजपुरवठा खंडीत झाल्यावर व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. शहरवासीयांना निश्चित केलेल्या दिवशी सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी आता टँकरच्या माध्यमातुन साठवण टाकीत पाणीसाठा करून ते पाणी पुरवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
शहरातील पाणीटंचाई, तोंडावर आलेला पावसाळा या पार्श्वभूमिवर पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना २४ तास अलर्ट रहाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही एड. सौ. खलिफे यांनी दिली आहे.
राजापूर शहर वासीयांवरिल पाणीटंचाईचे संकट पुढील वर्षी पुर्णपणे दूर होणार आहे. कारण नवीन पर्यायी धरणाचे काम पुर्णत्वाला गेले असून या पावसाळयात पाणीसाठा करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी शहरवासीयांना टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. मात्र तरीही उपलब्ध पाणीसाठयात नियोजन करून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे काम आंम्ही करत आहोत. रविवारी धरणाचे काम सुरू असतानाच कोदवली धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. आपण स्वता, उपनगराध्यक्ष विनय गुरव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी घटनास्थळी जाऊन रात्री ११ वाजेपर्यंत काम करून घेऊन ही पाणीपुरवठा वाहिनी पुर्ववत जोडून पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र कोदवली धरणातील साठा कमी झाला आहे, तर शिळकडून येणाऱ्या पाणीपुरवठयात खंडीत होणाऱ्या विजपुरवठयाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठयातही व्यत्यय येत आहे.
या पार्श्वभूमिवर नगर परिषद प्रशासनाकडुन अग्नीशामक बंबाच्या टँकरमधून दररोज दोन लाख लिटर पाणी साठवण टाकीत आणून ओतले जात आहे. तर आता प्रत्येकी दहा हजार लिटरचे आणखी दोन टँकर अधिग्रहण करून त्यांच्या मार्फत साठवण टाकीत पाणीसाठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून त्या त्या भागात सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे एड. खलिफे यांनी सांगितले.
सध्या कोदवली धरण परिसरातील गाळ नाम फाऊंडेशनच्या माध्यमातुन काढण्याचे कामही सुरू असून यामुळेही भविष्यात पाणीसाठयात वाढ होणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई, मान्सूनपुर्व तयारी या पाश्वभूमिवर प्रशासनाला अलर्ट रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खास करून पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना २४ तास अलर्ट रहाण्याचे आदेश देण्यात आले असून सगळयांच्या सुट्टयाही रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचे एड. खलिफे यांनी सांगितले. पाणीटंचाई व आपतकालीन परिस्थितीत कोणताही हलगर्जीपणा आपण खपवून घेणार नाही असा ईशारा एड. खलिफे यांनी प्रशासनाला दिला आहे.
पावसाळयापुर्वीच्या कामांना वेग
शहरात पावसाळयापुर्वी करावयाची कामेही प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. नाले व गटार सफाई, शहरातील स्वच्छता, झाडी तोडणे यांसारखी कामे करण्यात येत आहेत. नागरिकांना पावसाळयात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. तर पावसाळयात आपतकालीन परिस्थितीसाठीही न. प. प्रशासन सज्ज असून न. प. प्रशासनाकडून छोटा ट्रकक्टरवरील जेसीबीही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एड. खलिफे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, बांधकाम सभापती सुबोध पवार, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.