कायगो कायाकिंग जलक्रीडा व्यवसायाच्या शुभारंभाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध
पोलिसांच्या पत्रानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाची कारवाई; कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णय
देवगड : प्रतिनिधी

मिठमुंबरी बागवाडी येथील जेटीवर ‘कायगो कायाकिंग’ या जलक्रीडा व्यवसायाच्या शुभारंभाला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बंदर विभागाने मिठमुंबरी जेटीचा वापर बंद केला आहे. पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत जेटीच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे बंदर विभागाने स्पष्ट केले आहे.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिठमुंबरी बागवाडी येथे ‘कायगो कायाकिंग’ या जलक्रीडा व्यवसायाच्या शुभारंभाच्या वेळी स्थानिक मच्छीमार आणि आयोजक यांच्यात विरोधाची परिस्थिती निर्माण झाली होती. संभाव्य वाद आणि सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवगड पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांना घटनास्थळावरून जाण्यास सांगितले. त्यानंतर जेटीवरील कार्यक्रम थांबविण्यात आला होता.
या घटनेनंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या देवगड बंदर कार्यालयाला पत्र पाठवून मिठमुंबरी जेटीवरील प्रवेश बंद करण्याची विनंती केली होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयातून पर्याय निघेपर्यंत जेटी सर्वांसाठी बंद ठेवावी, प्रवेशस्थळी सूचना लावाव्यात आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
पोलिसांच्या या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सहाय्यक बंदर निरीक्षक कार्यालयाने २७ ऑक्टोबर रोजी देवगड पोलीस ठाण्याला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत मिठमुंबरी जेटीच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्राच्या प्रती प्रादेशिक बंदर अधिकारी, सिंधुदुर्ग, तहसीलदार देवगड, मिठमुंबरी ग्रामपंचायतीचे सरपंच, स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था तसेच संबंधित कायाकिंग व्यावसायिकांना माहितीसाठी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या घटनेप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), १८९(२), १९० आणि ३५१(२) अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलक्रीडा व्यवसायाच्या शुभारंभास अटकाव करणे, आंदोलन व जलसमाधी घेण्याची धमकी देणे, तसेच संबंधित ठिकाणी व्यवसाय सुरू न करण्याचा इशारा दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा तपास देवगड पोलीस करीत आहेत.
जेटीचा वापर, प्रवेश नियंत्रण आणि जलक्रीडा व्यवसायाच्या आयोजनाबाबत संबंधित विभागांमध्ये समन्वयातून तोडगा निघेपर्यंत बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे मिठमुंबरी येथील जलक्रीडा व्यवसायाच्या भवितव्याबाबत तसेच जेटीचा वापर पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत पुढील प्रशासकीय निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.












