साटवली भंडारवाडी येथील घटना, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) मूळ सामाईक घरातील वादातून महिलेच्या डोक्यात कोयता घालून तिला गंभीर जखमी केले. तसेच पती आणि तिला लाथा बुक्क्याने मारहाण, शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सात जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुनिता सुरेश चव्हाण ( वय ५९), पती सुरेश यशवंत चव्हाण (वय ६५) व त्यांची नात ग्रंथा ( तिघे राहणार साटवली लावगणवाडी) हे आपल्या मूळ घरात साटवली भंडारवाडी येथे देवाच्या पाया पडण्यासाठी गेले होते. यावेळी प्रभाकर यशवंत चव्हाण (वय ७५, साटवली भंडारवाडी) यांनी सामायिक देव आणि देवघर यावरून वाद केला. यावेळी प्रसाद प्रभाकर चव्हाण याने घरातील कोयता आणून फिर्यादी सुनिता सुरेश चव्हाण यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्या खाली पडल्या असता पती सुरेश चव्हाण त्याच्या मदतीला धावले.
याच वेळी प्रभाकर चव्हाण, मारुती यशवंत चव्हाण, माधवी मारुती चव्हाण आणि विजया प्रभाकर चव्हाण यांनी सुनीता व त्यांचे पती सुरेश चव्हाण या दोघांना लाथा बुक्क्याने, हाताच्या ठोशाने मारहाण केली . शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिली. तर प्रतीक्षा अनिरुद्ध माने हिने लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच प्राजक्ता प्रसाद चव्हाण हिने लोखंडी रॉड ने सुनीता चव्हाण यांच्या डाव्या पायावर मारून दुखापत केली. ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सातही जणांनी सुनीता चव्हाण यांची साडी धरून घरातून अंगणात फरफटत ओढत नेले.
या प्रकरणी सुनिता सुरेश चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रभाकर चव्हाण, मारुती यशवंत चव्हाण, माधवी मारुती चव्हाण, विजया प्रभाकर चव्हाण, प्रतीक्षा अनिरुद्ध माने, प्राजक्ता प्रसाद चव्हाण आणि प्रसाद प्रभाकर चव्हाण या सातही जणांवर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७९, ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३),३५१(३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.













