लंडनच्या बसवर झळकली महाराष्ट्र पर्यटनाची जाहिरात; मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई, दि.१९ मे २०२६ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनानिमित्त न्यूयॉर्कच्या जागतिक प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर झळकलेल्या महाराष्ट्र पर्यटनाच्या जाहिरातीनंतर आता लंडनमधील बसवर दिसलेल्या ‘अद्वितीय महाराष्ट्र’ मोहिमेची जोरदार चर्चा आहे. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका मराठी तरुणाने बसवरील महाराष्ट्र पर्यटनाची जाहिरात पाहिल्यानंतर व्यक्त केलेली भावनिक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

“कुठे पोचला महाराष्ट्र माझा” अशा शब्दांत सुरू होणारी त्याची पोस्ट अनेक मराठी नागरिकांच्या भावना व्यक्त करणारी ठरत आहे. “लंडनच्या बसवरील ही जाहिरात पाहताच महाराष्ट्राची आणि तिथल्या सौंदर्याची खूप आठवण आली. मन अगदी भावुक झाले.” असे म्हणत त्याने महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या भावना मांडल्या. पुढे “या जाहिरातीने मन जिंकले आणि महाराष्ट्राला परत जाण्याची इच्छा निर्माण केली… सलाम आहे @maharashtratourismofficial ला,”अशी प्रतिक्रिया त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

 

या पोस्टसोबत शेअर करण्यात आलेला व्हिडीओ सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जगभरातील मराठी बांधवांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेकांनी “महाराष्ट्राचा जागतिक प्रवास”, “जगभर पोहोचलेला महाराष्ट्र” अशा प्रतिक्रिया देत अभिमान व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मा. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विभागाने जागतिक स्तरावर ‘अद्वितीय महाराष्ट्र’ ब्रँड अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रचार मोहीम सुरू केली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची जागतिक पातळीवर प्रभावी मांडणी करण्यावर भर दिला जात आहे.

 

याबाबत प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “जगभरातील मराठी बांधवांकडून महाराष्ट्र पर्यटन मोहिमेला मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत अभिमानास्पद आहे. टाइम्स स्क्वेअरनंतर लंडनसारख्या जागतिक शहरांमध्ये महाराष्ट्र पर्यटनाची जाहिरात झळकणे म्हणजे राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जात असल्याचे द्योतक आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी नागरिकांच्या भावना या माध्यमातून व्यक्त होत आहेत, ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षण वाढेल आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळेल.”

 

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरनंतर आता लंडनसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये महाराष्ट्र पर्यटनाच्या जाहिराती झळकू लागल्याने राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, सह्याद्रीचे निसर्गवैभव, कोकण पर्यटन तसेच आधुनिक शहरी पर्यटन यांची आकर्षक झलक या मोहिमेद्वारे जगासमोर मांडली जात आहे.

 

पर्यटन विभागाच्या या जागतिक प्रचार मोहिमेमुळे परदेशातील मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्राविषयी नव्याने आपुलकी आणि अभिमानाची भावना निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष महाराष्ट्राकडे वेधून राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.