जनजातीय सांस्कृतिक संमेलनासाठी मडगाव-शकूर बस्ती विशेष रेल्वेच्या डब्यांमध्ये वाढ

रत्नागिरी : दिल्ली येथे २४ मे २०२६ रोजी आयोजित जनजातीय सांस्कृतिक संमेलनासाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन – शकूर बस्ती – मडगाव जंक्शन विशेष रेल्वेच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११०८ / ०११०७ मडगाव जंक्शन – शकूर बस्ती – मडगाव जंक्शन विशेष रेल्वेची रचना सुधारित करण्यात आली आहे.

 

पूर्वी या गाडीत १८ स्लीपर, २ जनरल आणि २ एसएलआर/डी असे एकूण २२ डबे होते. आता सुधारित रचनेनुसार स्लीपर डब्यांची संख्या २० करण्यात आली असून २ जनरल व २ एसएलआर/डी असे मिळून गाडीमध्ये एकूण २४ डबे असतील.

 

ही सुधारित रचना गाडी क्रमांक ०११०८ मडगाव जंक्शन येथून २२ मे २०२६ पासून, तर गाडी क्रमांक ०११०७ शकूर बस्ती येथून २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

 

या गाड्यांचे थांबे व वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नर्कर यांनी केले आहे.