शाहूपुरी परिसरात भीतीचे वातावरण…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर : शहरातील रुईकर कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तब्बल १लाख ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकारामुळे शाहूपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२२६ अन्वये बीएनएस कलम ३०४,३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुशीला मोहन रोहिडा (वय ६५, रा.रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या गुरुवारी सकाळी सुमारे ८:१५ च्या दरम्यान ‘ग्लोमिंग बर्ड्स स्कूल’ जवळ मॉर्निंग वॉक करत होत्या. यावेळी काळया रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमामी त्यांचा पाठलाग केला. त्यातील जांभळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने अचानक त्यांच्या गळ्यातील अंदाजे १६ते १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून चोरून घेऊन गेले. त्यानंतर दोघेही संशयित निळा-पांढरा चौकडीचा शर्ट घातलेल्या साथीदारासह मोटरसायकलवरून रुक्मिणी नगरच्या दिशेने फरार झाले.
घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादी यांनी घरी जाऊन नातेवाईकांशी चर्चा केली. व त्यानंतर घरच्यांसोबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोन्याच्या चीनची किंमत १लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासनी केली जात आहे.













