‘डायल ११२’ प्रणालीच्या कार्यात उल्लेखनीय सुधारणा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ‘डायल ११२’ आपत्कालीन सेवा प्रणालीमार्फत नागरिकांना तात्काळ मदत व जलद प्रतिसाद देण्याच्या कार्यात उल्लेखनीय सुधारणा झाली असून, राज्यातील क्रमवारीत रत्नागिरी जिल्ह्याने ३२ व्या स्थानावरून थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस दलाने आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी समन्वय, तत्परता आणि वेगवान सेवा देण्यावर भर दिल्याने हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात ‘डायल ११२’ वर प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या आपत्कालीन कॉल्सवर तातडीने कार्यवाही केली जाते. संबंधित पोलीस ठाणे व मोबाईल पथकांना तत्काळ माहिती देऊन भांडणे, अपघात, महिलांविषयक तक्रारी, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित घटनांमध्ये त्वरित पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. अनेक प्रकरणांमध्ये वेळेत घटनास्थळी पोहोचून जीवितहानी टाळणे, वाद शांत करणे तसेच नागरिकांना सुरक्षित मदत पुरविणे शक्य झाल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला एकूण ७ हजार ४०० कॉल्स प्राप्त झाले होते. त्या वेळी कॉल्सवरील सरासरी प्रतिसाद वेळ ८.४५ मिनिटे इतकी होती आणि या कामगिरीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात ३२ वा क्रमांक होता. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विशेष लक्ष घालून डायल ११२ प्रणालीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना, मार्गदर्शन तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर दिला. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या माध्यमातून दररोज आढावा घेऊन अडचणींचे निराकरण करण्यात आले.
या प्रयत्नांमुळे जानेवारी २०२६ ते मे २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या ९२१ कॉल्सवरील सरासरी प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा होऊन ती ६.३४ मिनिटांवर आली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्याने राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवत ७ वा क्रमांक पटकावला आहे. पोलीस दलाच्या समन्वयपूर्ण आणि तत्पर कामगिरीमुळे ही सुधारणा शक्य झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक वेगवान, परिणामकारक आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी ‘डायल ११२’ प्रणाली अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ‘डायल ११२’ या क्रमांकाचा निःसंकोचपणे वापर करावा, असे आवाहन केले आहे.












