दापोली हर्णे येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा शुभारंभ
चिपळूण (प्रतिनिधी) : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, राष्ट्रनिर्मितीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे आणि कार्यकर्ता हा केवळ पक्षाचा नव्हे तर समाजपरिवर्तनाचा वाहक असला पाहिजे, हा या प्रशिक्षण महाअभियानामागील मुख्य उद्देश आहे. तसेच कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या सक्षम करून राष्ट्रसेवेच्या कार्यात अधिक प्रभावीपणे योगदान देता यावे, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे, असे प्रतिपादन भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दापोली-हर्णे येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उद्घाटन प्रसंगी आपले मत मांडले.
भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या शुभहस्ते अगस्त्य हॉटेल, हर्णे ता: दापोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रशांत यादव यांनी आपले मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, संघटनात्मक शिस्त आणि नियोजन समजून घेण्यासाठी या प्रशिक्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या. कारण, अशा प्रशिक्षणामधून त्यातले स्वतःच्या व्यक्ती महत्त्वाची जडणघडण होत असते. त्यामुळे अगदी लक्ष देऊन प्रशिक्षणाचा फायदा करून घ्या, असेही आवाहन यादव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत प्रशिक्षण वर्गांचे महत्त्व अधिक वाढले आहे. संघटन कौशल्य, जनसंपर्क, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि समाजातील विविध घटकांशी सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व स्पष्ट दिशा मिळते. प्रशिक्षित आणि विचारांनी समृद्ध कार्यकर्ता हा कोणत्याही संघटनेचा सर्वात मोठा आधारस्तंभ असतो. त्यामुळे अशा उपक्रमांतून भविष्यात अधिक सक्षम, संवेदनशील आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व घडण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, मुंबई महापालिका गटनेते गणेश खंडकर, भाजप नेते वैभव खेडेकर, देवरुखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, गुहागरच्या नगराध्यक्षा निता मालप, गुहागर पंचायत समितीचे सभापती निलेश सुर्वे, पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानचे रत्नागिरी दक्षिण जिल्हा संयोजक आशिष खातू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप सुर्वे, रत्नागिरी उत्तरचे जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













