कोकणात कोण लढणार…?

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर

कोकणच्या या स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय समिकरण बदलले आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे फार प्राबल्य उरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच अस्तित्व रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात आहे. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अस्तित्वहिन आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाते की महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांकडून कोकणच्या या जागेवर दावा केला गेल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनिल तटकरे हे राजकीय तडजोडी करण्यात माहिर मानले जातात. सर्वच पक्षातील नेत्यांशी असलेल्या ‘स्नेहपूर्ण’ संबंधांचा उपयोग करत खा.सुनिल तटकरे या निवडणुकीत आता कोणती किमया साधणार हे पहाणं अधिक औत्स्तुक्याचे असणार आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुका येत्या १८ जून रोजी पार पडत आहेत. राज्यातील १६ स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुका होणार असून यासाठी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) या महायुतीतून आणि राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीमध्ये ही निवडणुक होणार आहे. मागील सहा वर्षापूर्वीच्या निवडणुकीतील राजकीय समिकरण आज पूर्णपणे बदलेली आहेत. पक्षीय बलाबल याचा विचार करताना राज्यामध्ये राजकारणात झालेल्या सत्तांतर आणि बदलाचा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल. त्या राजकीय बदलाचे प्रतिबिंग या निवडणुकीत दिसल्याशिवाय रहाणार नाही.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य मतदार संघाची पहिली निवडणुक १९८८ मध्ये झाली. १९८८ मधली कोकणातील राजकीय पक्षिय स्थिती आणि प्राबल्य हे काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, जनतादल यांच होते. त्यामुळे १९८८ च्या पहिल्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्वराज्य संस्था मतदार संघातून शेकापकडून विजय सावंत यांनी निवडणुक लढवली होती. तर १९९४ साली विजय सावंत यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीत विजय सावंत बिनविरोध निवडून आले होते. सर्वच राजकीय पक्षनेतृत्वाचा पाठींबा मिळवण्याची ‘किमया’ विजय सावंत यांनी साधली होती. खरंतर १९९० नंतर कोकणातील राजकीय संदर्भ बदलण्याला प्रारंभ झाला होता. कोकणात १९९० साली विधानसभा निवडणुकीत कणकवली-मालवण विधानसभा निवडणुकीतून विद्यमान खासदार नारायण राणे विजयी झाले. आणि कोकणात खऱ्याअर्थाने शिवसेनेची एण्ट्री झाली. त्यानंतर २००० साली झालेल्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे ठाणे महानगरपालिकेचे महापौर अनंत तरे हे शिवसेनेतर्फे निवडणुक रिंगणात उतरले. आणि २००० साली शिवसेनेचे स्व. अनंत तरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विजयी झाले. अनंत तरे यांच्या विजयाने कोकणात शिवसेनेचा भगवा फडकला. सन २००६ सालापासून या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसच प्राबल्य राहीलं. २००६ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आताचे गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या मतदार संघातून निवडणुक लढवून विजय मिळवला. त्यावेळी २००६ मध्ये खा. नारायण राणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाले होते. त्यामुळे आ. भास्कर जाधव यांना विजयी होणे अधिक सोपे बनले.
२००९ साली विधानसभा निवडणुक जाहीर झाली. त्या निवडणुकीत आ.भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुक लढवली त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघाची जागा रिक्त झाली. २०१० साली कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची पोट निवडणुक जाहीर झाली. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रायगडचे विद्यमान खा. सुनिल तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे हे निवडणुक रिंगणात उतरले. २०१२ साली झालेल्या निवडणुकीतही अनिल तटकरे पुन्हा निवडून आले. त्यामुळे या स्वराज्य संस्था मतदार संघात सर्वांना सोबत घेत ‘तटकरे’ कुटुंबाने आपली पकड अधिक मजबुत केली. २०१८ च्या या मतदार संघातील निवडणुकीत आ. अनिल तटकरे यांना थांबवत खा.सुनिल तटकरे यांनी आपले सुपूत्र अनिकेत तटकरे यांना निवडणुक रिंगणात उतरविले. २०१८ च्या निवडणुकीत कोकणातील ‘राणे-तटकरे’ मैत्रीचा फायदा निश्चितपणे खा.सुनिल तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांना झाला. २०१८ च्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांनी शिवसेना भाजपा उमेदवाराचा पराभव करत विजय संपादन केला. अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ ३१ मे २०२४ रोजी संपला.
मधल्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुक प्रलंबित राहिल्याने स्वराज्य संस्था मतदार संघातील मतदारच नसल्याने या मतदार संघाची निवडणुक होऊ शकली नाही. आता रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणुक येत्या १८ जून रोजी मतदान आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. कोकणच्या या स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय समिकरण बदलले आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे फार प्राबल्य उरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच अस्तित्व रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात आहे. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अस्तित्वहिन आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाते की महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांकडून कोकणच्या या जागेवर दावा केला गेल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनिल तटकरे हे राजकीय तडजोडी करण्यात माहिर मानले जातात. सर्वच पक्षातील नेत्यांशी असलेल्या ‘स्नेहपूर्ण’ संबंधांचा उपयोग करत खा.सुनिल तटकरे या निवडणुकीत आता कोणती किमया साधणार हे पहाणं अधिक औत्स्तुक्याचे असणार आहे. खा.सुनिल तटकरे हे तिसऱ्यांदा सुपूत्र अनिकेत तटकरे यांना या निवडणुकीत उतरवणार की राष्ट्रवादीचे रायगडमधील खा.तटकरे सहकारी साबळे यांना संधी देणार? हे पहावं लागेल.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठाचे काही मतदार या मतदार संघात आहेत. त्यामुळे शिवसेना(उबाठा) या निवडणुकीत उतरण्याची शक्यता नसली तरीही महाविकास आघाडी या निवडणुकीत उतरण्याची शक्यता नसल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रस्तरावर महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्यूला कसा ठरेल त्यावरच कोकण स्वराज्य संस्था मतदार संघात कोण उमेदवार असेल ते निश्चित होईल.