“कधी कधी निसर्गाचे सर्वात मोठे रहस्य एखाद्या छोट्याशा फुलात दडलेले असते. त्या फुलाकडे आपण केवळ सौंदर्य म्हणून पाहतो; पण निसर्ग त्यात संपूर्ण जीवनसाखळी पाहत असतो. कंदील पुष्प हे अशाच एका अद्भुत निसर्गचमत्काराचे नाव आहे.”
पावसाच्या पहिल्या सरी कोकणच्या जांभ्या कातळसड्यांवर बरसल्या की वर्षभर रखरखीत वाटणारा परिसर अचानक रंग, सुगंध आणि जीवनाने बहरून जातो. काही आठवड्यांसाठी उमलणाऱ्या असंख्य रानफुलांमध्ये शांतपणे डोलत असते एक दुर्मीळ, नाजूक आणि उत्क्रांतीचे विलक्षण रहस्य जपणारे फूल—कंदील पुष्प (Ceropegia).
कंदीलासारखी आकर्षक रचना आणि परागीभवनाची अनोखी यंत्रणा यामुळे Ceropegia जगभरातील वनस्पतिशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. पश्चिम घाट, विशेषतः कोकणातील कातळसडे, ही या वनस्पतींची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत.
राजापूर तालुक्यातील अनेक वर्षांच्या क्षेत्रीय अभ्यासादरम्यान मला Ceropegia attenuata, Ceropegia vincaefolia आणि Ceropegia oculata (Peacock Ceropegia / मोर खरचुडी) या तीन दुर्मीळ प्रजातींचे निरीक्षण करता आले. विशेष म्हणजे Ceropegia vincaefolia ही प्रजाती माझ्या आजपर्यंतच्या निरीक्षणात केवळ एका मर्यादित अधिवासातच आढळली. अशा प्रजातींचे अस्तित्व हे त्या अधिवासाच्या पर्यावरणीय समृद्धीचे द्योतक असून त्यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे.
कंदील पुष्पांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परागीभवन प्रक्रिया. विशिष्ट लहान माश्या आणि इतर सूक्ष्म कीटकांना आकर्षित करण्यासाठी या फुलांची रचना उत्क्रांत झाली आहे. हे सूक्ष्म कीटक या वनस्पतींच्या पुनरुत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच या वनस्पतींचे अस्तित्व त्या कीटकांवर, आणि त्या कीटकांचे अस्तित्व या नाजूक अधिवासावर अवलंबून आहे. निसर्गातील परस्परावलंबित्वाचे हे अत्यंत सुंदर उदाहरण आहे.
पावसाळ्यात काही दिवसच दिसणाऱ्या या वनस्पतींचे पर्यावरणीय योगदान मात्र वर्षभर टिकून राहते. त्या परागीभवन करणाऱ्या कीटकांना आधार देतात. हे कीटक इतर अनेक वनस्पतींचे परागीभवन करतात. त्यांच्यावर कोळी, बेडूक, सरडे, पक्षी आणि इतर असंख्य जीव अवलंबून असतात. अशा प्रकारे एका छोट्याशा रानफुलापासून संपूर्ण अन्नजाळे आणि परिसंस्था जोडलेली असते.
आज ही जीवनसाखळी गंभीर धोक्यात आली आहे. शेतीमध्ये बेसुमार प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके आणि तणनाशके परागीभवन करणाऱ्या उपयुक्त कीटकांची संख्या झपाट्याने कमी करत आहेत. हवामान बदलामुळे पावसाच्या वेळापत्रकात होणारे बदल, कातळसड्यांचे उत्खनन, विकासकामांसाठी होणारे सपाटीकरण, अनियंत्रित पर्यटन, ऑफ-रोड वाहनांची वर्दळ, प्लास्टिक प्रदूषण आणि दुर्मीळ वनस्पती उपटून नेण्याच्या घटना या सर्वांचा या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहे.
निसर्गात कोणतीही प्रजाती निरुपयोगी नसते. प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाशी जोडलेला असतो. एखादी वनस्पती नामशेष झाली, तर तिच्यावर अवलंबून असलेले परागीभवन करणारे कीटक कमी होतात. त्या कीटकांवर जगणारे इतर जीव प्रभावित होतात. अन्नजाळ्यातील ही साखळी तुटत गेली, तर त्याचे परिणाम शेवटी मानवालाही भोगावे लागतात. परागीभवन घटल्यास शेती उत्पादनावर परिणाम होतो. जैवविविधता कमी झाल्यास माती, पाणी, हवामान आणि अन्नसुरक्षा यांचे संतुलनही ढासळू लागते.
म्हणूनच कातळसड्यांकडे ‘पडीक जमीन’ म्हणून पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. हे कातळ म्हणजे निसर्गाने लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत घडवलेली जैवविविधतेची जिवंत प्रयोगशाळा आहेत. येथे उमलणारे प्रत्येक फूल, प्रत्येक कीटक आणि प्रत्येक सूक्ष्म जीव हा या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहे.
पावसाळ्यात या कातळसड्यांवर भटकंती करणाऱ्या प्रत्येक निसर्गप्रेमी आणि पर्यटकाला एक मनापासूनची विनंती—फुले तोडू नका, कंद उपटू नका, छायाचित्रासाठी अधिवास तुडवू नका, ऑफ-रोड वाहनांचा वापर टाळा, प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका आणि शक्यतो निश्चित पायवाटेनेच भ्रमंती करा. तुमची एक छोटीशी काळजी एखाद्या दुर्मीळ प्रजातीचे भविष्य वाचवू शकते.
आज आपण एका कंदील पुष्पाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला एक सुंदर फूल दिसते; पण निसर्गाला त्यात संपूर्ण जीवनचक्र दिसते. त्या एका फुलाशी एक कीटक जोडलेला असतो, त्या कीटकाशी एक पक्षी, त्या पक्ष्याशी जंगल, त्या जंगलाशी पाऊस, त्या पावसाशी नदी, त्या नदीशी शेती आणि त्या शेतीशी आपले अस्तित्व.
म्हणूनच कातळसडे पडीक नाहीत; ते जैवविविधतेची जिवंत विद्यापीठे आहेत. कंदील पुष्पे ही त्या विद्यापीठातील नाजूक पण अत्यंत महत्त्वाची पाने आहेत. ही पाने जपली, तरच निसर्गाचा हा अमूल्य ग्रंथ पुढील पिढ्यांपर्यंत अखंड पोहोचेल.
धनंजय मराठे
9423297736
कातळशिल्प,सड्यांवरील रान फुले अभ्यासक संशोधक
राजापूर











