मुंबई- गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी आणखी काही कालावधी लागणार?

चिपळूण /संतोष सावर्डेकर:

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला १५ वर्षांचा कालावधी लोटून अजूनही हा महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. महामार्गावरील चिपळूण संगमेश्वरसह प्रमुख उड्डाणपुलाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पावसाळ्यात परशुराम घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे डोंगराकडील बाजूचा मार्ग काही वेळा बंद ठेवण्याची वेळ आली. तर गेल्या पावसात पेढे बाजूकडील गॅबियन वॉल कोसळण्याची घटना घडल्याने पावसाळ्यात परशुराम घाटात एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवावी लागली. या पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पूर्णत्वास नेण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात दोन्ही मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये यश येईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चिपळूणमधील बहादूरशेखनाका येथे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत येत असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग आणि लॉन्चर यंत्रणा १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कोसळली सुमारे १.८५ लांबीच्या या पुलाचे काम सुरू असताना हा अपघात घडला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नाही. या घटनेनंतर चिपळूण शहरातील उड्डाणपुलाच्या संरचनेत बदल करण्यात आला. यानुसार या पुलाचे काम सुरू असून ९८.७ पूर्ण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. परंतु, दुसरीकडे चिपळूणवासीयांनी उड्डाणपूल कापसाळ शासकीय विश्रामगृहापर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्याचा उड्डाणपूल चिपळूण पंचायत समिती समोर पूर्ण होत असल्याने पाग परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या दृष्टीने पागवासीयांनी माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे यांना निवेदन दिले होते. यानुसार खा. राणे यांनी केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. यानुसार प्रस्ताव देखील तयार झाला असल्याचे समोर आले. परंतु, पुढील कार्यवाही कधी होणार ? असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पाग पॉवर हाऊस येथे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना रस्ता क्रॉस करताना डोळ्यात तेल टाकून ये-जा करावे लागत आहे. काही वेळा अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे हा उड्डाणपूल कापसाळ शासकीय विश्रामगृहापर्यंत नेण्याची गरज बनली आहे.

तर दुसरीकडे सर्विसरोडची दुरावस्था बनली आहे गटारांवरील काही ठिकाणी झाकणे उघडे असल्याने तर काही ठिकाणी गटारे खचल्याचे प्रकार समोर येत असल्याने याकडे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग तसेच ठेकेदार कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. मान्सून पूर्व पावसाळ्यामुळे आगवे येथील उड्डाण पुलाखाली पाणी साचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून या ठिकाणी पाणी निचऱ्याची व्यवस्थित व्यवस्था न केल्याने हा प्रकार घडल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चिपळूण शहरात बहादूरशेखनाका ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण व ठेकेदार कंपनीने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, हे पावसाळ्यात समजणार आहे. तर दुसरीकडे परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर व झऱ्यांच्या ठिकाणी पाईप टाकून पावसाळ्यात पाणी सहजपणे वाहून जाईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून यामुळे या मार्गावरील प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. सध्या परशुराम घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे करण्यात आले असून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून पावसाच्या दृष्टीने परशुराम घाट घाटातील वाहतूक सुरळीत राहण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदार कंपनीने केले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण येथील अधिकारी पंकज गोसावी यांनी दिली आहे.

चिपळूणसह संगमेश्वर, निवळी, पाली आणि लांजा येथील उड्डाणपूलांची कामे जून अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असले तरी काही मूलभूत सुविधा अपूर्ण असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक उड्डाणपूलांवर अद्याप वीज पुरवठा नाही. दिशादर्शक फलकांचा अभाव, बेकायदेशीर मिडल ओपनिंग यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी अजूनही काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.