मांदिवली उर्दू शाळेजवळ अपघातांची मालिका कायम; ग्रामस्थ संतप्त

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील मांदिवली येथील उर्दू शाळा परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आज २५ मे रोजी पुन्हा एकदा मोठा अपघात घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मानवाधिकार चौकशीनंतर या परिसरातील हा जवळपास तिसरा अपघात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन तसेच धोकादायक वाहतुकीबाबत तक्रारी करूनही कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. यावेळी संबंधित मायनिंग दलालांकडून अरेरावी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनास्थळी उपस्थित नागरिक फोटो व व्हिडिओ काढत असताना त्यांना मज्जाव करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले. मांदिवलीचे पोलिस पाटील मिथुन चिंचघरकर घटनास्थळी उपस्थित असूनही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मांदिवलीचे तलाठी सदानंद देवकर हे त्याच मार्गाने जात असताना ग्रामस्थांनी त्यांना अडवून पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार तलाठी देवकर यांनी संबंधित डम्परचे फोटो व व्हिडिओ घेत पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अपघातग्रस्त डम्परवरील नंबर प्लेट स्पष्ट दिसत नसल्याचेही समोर आले आहे. अनेक डम्परवर नंबर प्लेट अस्पष्ट असणे किंवा नंबर प्लेट न लावताच वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार RTO विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेची माहिती दापोली तहसीलदार यांना देण्यात आली असून संबंधितांवर लवकरच कारवाई होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.