वेंगुर्ले : प्रतिनिधी
म्हापण मंडळातील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या व अचूक माहिती नोंदविण्यात अडचणी येत असलेल्या वेदर स्टेशनमध्ये अखेर नवीन उपकरणे बसविण्यात आली आहेत. कुशेवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या या वेदर स्टेशनमध्ये आज क्लायमेट कंपनीचे पाटील सर यांच्या उपस्थितीत नवीन उपकरणांची स्थापना करण्यात आली.
सदर वेदर स्टेशन दुरुस्त करून त्यामध्ये नवीन उपकरणे बसविण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती श्री. सचिन देसाई भोगवे उपसरपंच श्री. रुपेश मुंडये श्री चेतन सामंत अभय परुळेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रव्यवहार तसेच विविध स्तरांवर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
वेदर स्टेशनमधून मिळणारी अचूक हवामानविषयक माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः आंबा विमा, काजू विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पंचनामे व भरपाई प्रक्रियेसाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यात अधिक अचूक माहितीच्या आधारे योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून संबंधितांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.












