शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची आक्रमक मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून राजरोसपणे खनिज सदृश्य मातीचे अवैध उत्खनन आणि चोरी सुरू आहे. हा सर्व प्रकार दोडामार्गचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या संगनमताने व पाठिंब्यानेच सुरू असल्याचा थेट आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची ‘नार्को टेस्ट’ करण्यात यावी, अशी मागणी संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच येत्या १० दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश केला. याप्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.
ते म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील एमआयडीसी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीचे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून या प्लॉटमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील माती चोरीला गेली आहे. एमआयडीसी हा शासनाचा अधिकृत प्रकल्प असून, त्या जागेत विनापरवाना खोदाई करणे आणि मातीची वाहतूक करणे हा पूर्णपणे बेकायदेशीर व गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
स्थानिक ग्रामस्थांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या अवैध उत्खननाबाबत प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून दिले होते. मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारींना कोणतीही किंमत दिली नाही. इतका मोठा गैरप्रकार सुरू असतानाही तहसीलदार यांनी अद्याप घटनास्थळाला भेट दिलेली नाही अथवा कोणतीही कारवाई केलेली नाही. स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली असून, यावरूनच तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक या चोरीमध्ये गुंतलेले आहेत हे स्पष्ट होते, असा आरोप परब यांनी केला.
प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तोफ डागताना संजू परब म्हणाले की, एरव्ही गरीब ग्रामस्थ आपल्या घराच्या बांधकामासाठी थोडी जरी वाळू काढायला गेले, तर हेच महसूल प्रशासन त्यांच्यावर दीड-दीड लाख रुपयांचा मोठा दंड आकारते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर खुलेआम शासकीय जागेतून मातीची चोरी आणि उत्खनन सुरू असताना महसूल व पोलीस प्रशासनाला ते का दिसत नाही? हा मोठा प्रश्न आहे. या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय एवढी मोठी चोरी होऊच शकत नाही. म्हणूनच या सर्व प्रकाराला जबाबदार धरून संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून यामागील सर्व सूत्रधार समोर येतील.
*उद्योगमंत्र्यांशी चर्चा; १० दिवसांत आंदोलनाचा इशारा*
या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी या प्रकरणात योग्य ती कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे संजू परब यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अहवाल मागवला आहे, तो आल्यावर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. मात्र, येत्या दहा दिवसांत स्थानिक प्रशासनाने या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर ठोस कारवाई केली नाही, तर शिवसेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला आहे.













