दोडामार्ग: सुहास देसाई
मोबाईल रिचार्जचे पैसे रिफंड मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात सायबर भामट्याने दोडामार्ग येथील एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला तब्बल १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदास गोपाळ मनेरिकर (वय ६३, रा. दोडामार्ग धाटवाडी, साई मंदिरच्या पाठीमागे) हे सेवानिवृत्त जीवन जगत आहेत. दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. “तुम्हाला तुमच्या मोबाईल रिचार्जचे १,४९९ रुपये रिफंड (परत) मिळणार आहेत. मी सांगतो तशी प्रक्रिया तुमच्या मोबाईलमध्ये करा,” असे त्या अज्ञात भामट्याने मनेरिकर यांना सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी मनेरिकर यांनी मोबाईलवरील गुगल (Google) मध्ये जाऊन अज्ञात इसमाने सांगितल्याप्रमाणे माहिती भरली. ही माहिती भरताच मनेरिकर यांच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ शाखा दोडामार्ग येथील दोन वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे लंपास करण्यात आले. त्यांच्या पहिल्या बचत खात्यातून ९५,००० रुपये आणि दुसऱ्या बचत खात्यातून ९८,५०० रुपये, असे एकूण १,९३,५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी फिर्यादी गुरुदास मनेरिकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल करण्याचे काम महिला पोलीस हवालदार (WHC) ९८० गवस यांनी केले असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) हेमचंद्र खोपडे हे स्वतः करीत आहेत.













