भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपाचे नेते वैभवजी खेडेकर, गुहागर उपसभापती निलेश सुर्वे राहणार उपस्थित
गुहागर प्रतिनिधी:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्यभिषेक दिनी विधान परिषदेचे आमदार मान.प्रमोद जठार गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळ गडावर उपस्थित राहून छत्रपतींना मानवंदना करणार आहेत.
मालकी हक्काच्या वादामुळे गेली अनेक वर्ष चर्चेत राहिलेला गोपाळगड काही दिवसापूर्वी नुसत्या आंबे उचलण्यावरून स्वतःला जमीन मालक म्हणविणाऱ्या मुजोर व्यक्तींमुळे पुन्हा चर्चेत आला होता. मालकी हक्कावरून वादातीत असणारा हा गोपाळगड मालकी हक्कातून मुक्त व्हावा याकरता स्थानिक ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, वृत्तपत्रे, शिवप्रेमी संस्था, सर्व राजकीय व्यक्तिमत्व आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांना पहिले यश २०१६ साली सन्मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारच्या काळात मिळाले. महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाने गोपाळगड किल्ल्याला “राज्य संरक्षित स्मारक” म्हणून घोषित केले. यानंतर या विरोधात स्वतःला मालक म्हणून मिरविणाऱ्या मणियार कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून शासनाने किल्ल्यातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली आणि या पुढील कार्यवाहीसाठी सर्व अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले. या गोष्टीला पूर्णत्वास जाण्यासाठी थोडा वेळ जात असताना पुन्हा मणियार यांनी आम्हीच या किल्ल्याचे व परिसराचे मालक असल्याचे सांगण्यात सुरुवात केली. याला निमित्त झाले ते किल्ला भेटीसाठी या परिसरातील आलेल्या पर्यटकांनी आंब्याच्या झाडाखाली आंबे उचलणे मात्र आता याबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.उदय सामंत आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मा.आशीष शेलार यांनी तातडीचे आदेश देऊन पुढील १५ दिवसात किल्ल्याबाबतची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या कामाला अधिक गती मिळावी, छत्रपतींच्या साम्राज्यातील गोपाळगड मालकीच्या वादातून मुक्त श्वास घेण्यासाठी सज्ज व्हावा, आजपर्यंत अनेकांनी केलेल्या श्रमाचे चीज व्हावे याकरता विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मान. प्रमोदजी जठार साहेब हे ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनी गोपाळगडावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान. सतीश राव मोरे, ज्यांनी या किल्ल्याकरता प्रारंभी अथक प्रयत्न केले होते असे भाजपाचे नेते वैभव खेडेकर, पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.













