“आई-वडिलांचे संस्कार, पत्नीचे पाठबळ आणि मित्रांची साथ; यशामागे सर्वांचे योगदान” – उमेश गाळवणकर

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचा सुवर्ण प्रवास; उमेश गाळवणकरांचा ५० वा वाढदिवस उत्साहात

 स्वप्निल कदम कुडाळ 

“माझ्या आई-वडिलांनी मला जन्म दिला, शिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शिकवण दिली. त्यानंतर समाजासाठी शक्य तेवढे चांगले काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था चालविताना अनेक अडथळे, संकटे आणि समस्या आल्या; मात्र प्रत्येक वेळी सर्व पक्षांतील राजकीय नेते, मित्रपरिवार आणि विशेषतः माझ्या पत्नीने मला भक्कम साथ दिली. एवढी मोठी संस्था चालवताना ‘काय झाले?’ असा प्रश्नही पत्नीने कधी विचारला नाही. तिच्या आणि तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळेच ही संस्था यशस्वीपणे उभी राहिली,” असे भावनिक मनोगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केले.

त्यांच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वाढदिवसानिमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात मित्रमंडळींच्या व संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. गाळवणकर यांनी संस्थेच्या वाटचालीतील संघर्षांनाही उजाळा दिला. “संस्था एमआयडीसीच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी अॅड. संग्राम देसाई यांच्या माध्यमातून माझी अडचण नारायण राणे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी कोणताही विलंब न करता एमआयडीसीकडून आलेल्या नोटिसीला दीर्घकालीन स्थगिती मिळवून दिली. त्यामुळे संस्था नियमितपणे चालू राहू शकली,” असे त्यांनी सांगितले. माजी आमदार वैभव नाईक तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

भविष्यातील संकल्पांबाबत बोलताना श्री. गाळवणकर म्हणाले, “अजून अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत. नेरूर येथे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे.”

कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, माजी आमदार वैभव नाईक, दादा साईल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सामंत, रणजित देसाई मनीष देसाई, सौ. अमृता गाळवणकर, धीरज चित्रकार, अरुण दाभोळकर, शरद चव्हाण, मोहन होडावडेकर, नकुल पारसेकर, पत्रकार शेखर सामंत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय वेंगुर्लेकर, माजी मुख्याध्यापिका काजरेकर, पल्लवी कामत, कल्पना भंडारी, अरुण मर्गज आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेश गाळवणकर यांच्या कार्याचा गौरव केला. प्रमोद कामत म्हणाले, “गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक व शैक्षणिक मदत केली आहे.”

माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, “शैक्षणिक संस्था चालविणे ही अत्यंत जबाबदारीची बाब आहे. उमेश गाळवणकर यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विचार कधीही संपत नाहीत आणि उमेश गाळवणकर हा समाजहिताचा विचारही असाच चिरंतन राहणार आहे.”

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गाळवणकर यांना युवकांचे प्रेरणास्थान संबोधत सांगितले की, “रेल्वे युनियनमधील कार्यकर्त्यापासून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. जात-पात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.”

दादा साईल यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “बॅरिस्टर नाथ पै यांचा सामाजिक वारसा गाळवणकर समर्थपणे पुढे नेत आहेत. कोरोना काळात त्यांनी ऑक्सिजन पुरवठा करून अनेकांचे प्राण वाचवले. त्यावेळी त्यांनी लोकांना ‘प्राणवायू’ दिला आणि आज शिक्षणाच्या माध्यमातून ‘ज्ञानवायू’ देत आहेत.”

अमित सामंत यांनी समाजवादी विचारसरणीचा वारसा जपल्याबद्दल गाळवणकर यांचे कौतुक केले. यावेळी धीरज दाभोळकर, अरुण दाभोळकर, शरद चव्हाण, नकुल पारसेकर आणि मोहन होडावडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

उमेश गाळवणकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षण, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.