दीड लाखांच्या दागिन्यांसह आरोपी जेरबंद…
मैत्रीला काळिमा फासणारी घटना…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे :करवीर : तालुक्यातील बहिरेश्वर गावात शुक्रवारी दुपारी घरफोडीची घटना घडली होती.घडलेल्या घरपोडीच्या घटनेचा करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासात उलडगडा करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीचा जवळचा मित्र चोरीमागील सूत्रधार निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिव माळवाडी बहिरेश्वर येथील संभाजी शिवाजी काशीद हे आपल्या कुटुंबांसह भा lत पेरण्यासाठी शेतात गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने लांपास केले होते.घरातील विश्वासाची जागा ओळखून चोरी करण्यात आल्याने संशयाची सुई जवळच्या व्यक्तीकडे वळली होती.
ही घटना उघडकीस आल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी गावात गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान फिर्यादीचा मित्र वैभव विश्वास पडवळे (वय २९,रा.बहिरेश्वर) याने चोरी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी खुपिरे फाटा परिसरात सापळा रचत आरोपी दागिने विक्रीसाठी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान त्याच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागिने असा तब्बल १ लाख ४४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कसून चौकशी केल्यानंतर वैभव पडवळे याने चोरीची कबुली दिली. मित्राच्या घरावर डल्ला मारून विश्वासाला तडा देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले. या यशस्वी कारवाईमुळे करवीर पोलिसांच्या तत्परतेचे आणि तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.













