२४ शाळांमधील ७३१ विद्यार्थ्यांना ४,१००वह्यांचे वाटप
देवरूख (प्रतिनिधी):
आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर, आंगवली येथे श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत शालेय साहित्य वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील २४ शाळांमधील एकूण ७३१ गरजू विद्यार्थ्यांना ४,१०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून नियोजनबद्ध वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य मोफत वाटप उपक्रमांतर्गत इयत्ता १ली ते ४थीच्या वर्गातील २६१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ ‘३-इन-१’ प्रकारच्या वह्या, तर इयत्ता ५वी ते १०वीच्या वर्गातील ४७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ मोठ्या वह्या देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने देवस्थान व ट्रस्टतर्फे दरवर्षी अशा विधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवणाऱ्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे, शिक्षक वर्गाचे आणि आंगवली ग्रामस्थांचे देवस्थान ट्रस्टतर्फे विशेष आभार मानण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.












