ग्रामस्थ उभारत आहेत लॉन गार्डन, चेंजिंग रूम व स्वच्छतागृह
प्रशासनाच्या मदतीने कोकणातील नवे पर्यटनस्थळ साकारण्याची अपेक्षा
स्वप्निल कदम | कुडाळ :कुडाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले बांबुळी हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले असून गावचे ग्रामदैवत श्री देव ब्रम्हेश्वर मंदिर आणि त्यालगतचा बारमाही पाण्याने भरलेला तलाव पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र या नैसर्गिक पर्यटनस्थळाचा विकास अद्याप अपेक्षित प्रमाणात झालेला नसल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत लोकवर्गणीतून परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. प्रशासनाची साथ लाभल्यास बांबुळी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरू शकते, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
ब्रम्हेश्वर मंदिर परिसरातील तलाव हे गावाचे प्रमुख आकर्षण आहे. बाराही महिने पाण्याने तुडुंब भरलेला हा तलाव आणि सभोवतालचा हिरवागार परिसर पर्यटकांना भुरळ घालणारा आहे. या ठिकाणी पर्यटन विकासाची मोठी क्षमता असूनही आवश्यक सुविधा आणि नियोजनाच्या अभावामुळे त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर बांबुळी ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून तलावालगतच्या परिसराच्या सुशोभीकरणास प्रारंभ केला आहे. या ठिकाणी भव्य लॉन गार्डन उभारले जात असून दोन चेंजिंग रूम तसेच स्वच्छतागृहाचे कामही प्रगतीपथावर आहे. भविष्यात या परिसरात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.
दैनिक प्रहारशी बोलताना सरपंच प्रशांत परब यांनी सांगितले की, “बांबुळी गाव निसर्ग संपत्तीने समृद्ध आहे. या परिसरात पर्यटन विकासाची मोठी संधी असून आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तलाव सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यास हे ठिकाण जिल्ह्यातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.”
तलावाशी ग्रामस्थांचे आर्थिक नातेही घट्ट जोडलेले आहे. गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी तलावात मत्स्यबीज सोडले जाते आणि वर्षअखेरीस करार पद्धतीने मासेमारी केली जाते. यातून मिळणारे उत्पन्न गावाच्या विकासकामांसाठी वापरले जाते. त्यामुळे तलावाचे संवर्धन आणि विकास हा ग्रामस्थांसाठी केवळ पर्यटनाचा विषय नसून आर्थिक बळकटीचाही महत्त्वाचा भाग आहे.
तलावालगतच असलेल्या श्री देव ब्रम्हेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. ग्रामस्थांच्या पुढाकारातून तलावात बोटिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून पर्यटक त्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटन यांचा अनोखा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो.
सध्या मंदिर परिसरातील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करून लॉन पसरविण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षापासून हे लॉन गार्डन विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा गावाचा मानस असून त्यातून गावाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
बांबुळीतील तलाव, मंदिर परिसर, बोटिंग सुविधा आणि विकसित होत असलेले लॉन गार्डन या सर्व बाबी लक्षात घेता या ठिकाणी पर्यटन विकासासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाने आवश्यक निधी आणि सुविधा उपलब्ध करून देत दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
चौकट
पर्यटन विकासाने रोजगारालाही चालना
बांबुळी येथील तलाव आणि परिसराचे सुशोभीकरण झाल्यास स्थानिक युवकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, बोटिंग, खाद्यपदार्थ विक्री, मार्गदर्शक सेवा आणि विविध पूरक व्यवसायांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पर्यटन विकास हा केवळ सौंदर्यीकरणाचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो.













