महामार्ग ठेकेदार कंपनीच्या चालढकल धोरणाचा फटका, नागरिकांतून संताप व्यक्त
संतोष कोत्रे
लांजा –: रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा फटका सध्या पडणाऱ्या पावसात लांजातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात साटवली रोड ते कोर्ले फाटा या साधारणपणे दोन किलोमीटरच्या अंतरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलातून वाट काढणे पादचारांसाठी आव्हान असून चिखलामुळे दुचाकीस्वार देखील घसरून पडण्याची भीती आहे. त्यामुळे लांजा शहरासाठी कोणी वालीच उरला नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले स्थितीत आहे. शहरातील गटारे, सर्विस रोड यांची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र ही कामे देखील अर्धवट स्थितीत असल्याने सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका या कामांना बसला असून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रहदारीने सर्व परिसरात चिखल निर्माण झाला आहे. काही ठिकाणी शहरात अर्धवट असलेली गटाराची कामे, सर्विस रोडची कामे यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून त्यातून वाट काढणे म्हणजे पादचाऱ्यांसमोर एक दिव्यच असून दुचाकी सारखी वाहने चिखलातून घसरून पडत आहेत तर अन्य वाहनांची देखील अवस्था फार बिकट होत आहे.


त्याचप्रमाणे वाहनांमुळे लोकांच्या अंगावरून चिखल उडून कपडे देखील खराब होत आहेत.अशा प्रकारे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या चालढकल धोरणामुळे शहरात अर्धवट असलेली गटारांची कामे सर्विस रोडची कामे, पुलाचे अर्धवट काम यामुळे लांजा साटवली रोड ते कोर्ले फाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण महामार्ग हा लाल रंगाने रंगून गेला असल्याचे चित्र
दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.












