महावितरण कार्यालयावर धडक देत सहाय्यक अभियंत्यांना धरले धारेवर, विचारला जाब
लांजा (प्रतिनिधी): वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे लांजा नगरपंचायती च्या नळ पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होत असल्याने संतप्त झालेल्या लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज मंगळवारी सकाळी महावितरण कार्यालयावर धडक देत सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना तब्बल दोन तास घेराव घालत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडिताचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महावितरण अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे, नवीन विद्युत खांब उभारण्यास होणारा विलंब तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे रखडल्याबाबतही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील नोकरदार, व्यापारी आणि गृहिणींना वारंवारच्या वीज खंडितीमुळे होत असलेल्या त्रासाची कैफियत त्यांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलकर्णी यांना चांगलाच जाब विचारला.तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, पाणी सभापती रफिक (गुल्ल्या) नेवरेकर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, गटनेते योगेश कावतकर, सचिन डोंगरकर, वैभव जोईल, पंढरीनाथ मायशेट्ये, सिद्धेश भुवड तसेच नगरसेविका श्रद्धा तोडकरी, निलिमा कनावजे, प्रांजल यादव, साक्षी मानकर, सुशीला कांबळे व प्रसाद भाईशेट्ये यांनी सहाय्यक अभियंता कुलकर्णी यांना धारेवर धरले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन आणि वारंवार सांगूनही महावितरणने काहीच केले नाही, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्ती काढून जनतेला वेठीस धरले जात आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करता काय? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच लांजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनवर महावितरणच्या ठेकेदार कंपनीकडून विजेचे पोल उभारण्यात आले आहेत. याबाबत गेले दोन महिन्यांपासून वारंवार नगरपंचायतीकडून पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार झाला आहे. त्यामुळे महावितरण हे ठेकेदार कंपनीला मॅनेज झालात का? असं गंभीर प्रश्न मिलिंद लांजेकर यांनी उपस्थित केला.
पाणी सभापती रफिक नेवरेकर आणि यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना सांगितले की, लांजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामध्ये अडचणी येत असतात, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला तरच पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य होईल. पाणीपुरवठा हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो, यापुढे काळजी घ्या की वीजपुरवठा खंडित होणार नाही जेणे करून पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अन्यथा याचे वाईट परिणाम महावितरण कार्यालयाला भोगावे लागतील असा कडक इशारा रफिक नेवरेकर यांनी दिला.
त्याचप्रमाणे नगरपंचायतीचे गटनेता योगेश कावतकर यांनी महावितरणचे अधिकारी फोन न उचलल्याचा मुद्दा पुढे आणत जोरदार ताशेरे ओढले. प्रत्येक वेळी नागरिकांचे फोन न उचलणे किंवा फोन बंद करून ठेवणे याच्यावरून योगेश कावतकर यांनी आक्रमक होत महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना जाब विचारला. यावर निलेश कुलकर्णी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने योगेश कावतकर जास्त आक्रमक झाले आणि यापुढे फोन न उचल्यास त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असे आक्रमक होत सांगितले.
स्वीकृत नगरसेवक सचिन डोंगरकर यांना सहाय्यक अभियंता कुलकर्णी यांनी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने त्यांनी दिलेली प्रश्नांची उत्तरे आणि त्यांची असलेली अडचण लेखी स्वरूपात मागितली. तसेच विजेचे पोल बसवण्यात येणाऱ्या अडचणी काय आहेत? किंवा पोल बसविण्यात ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे का? जे काय असेल ते लेखी दया असे डोंगरकर यांनी सांगताच सहाय्यक अभियंता कुलकर्णी पूर्णपणे निरुत्तर झाल्याचे दिसून आले.












