सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ व ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करा

आमदार दीपक केसरकर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आयुष अभियान नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ व ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देऊन प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.

आमदार केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असून, देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून लाभलेल्या बहुमानामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा अधिक वाढली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारतीय उपचार पद्धती जसे की आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि नॅचरोपॅथी यांचे मोठे आकर्षण आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फतही वैद्यकीय पर्यटनाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेले रेडी (ता. वेंगुर्ला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील आचरा आणि प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले आंबोली येथे मोठ्या संख्येने परदेशी आणि देशांतर्गत पर्यटक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी आयुष सेवा सुरू केल्यास वैद्यकीय पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे केसरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुष अभियान मार्गदर्शक सूचनांनुसार निधीची मागणी करण्यात आली आहे. यात बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि साहित्य व उपकरणांसाठी ५ लाख रुपये असे एकूण २० लाख रुपयांचे एकवेळ अनुदान, तसेच औषधे, आहार व इतर आवर्ती खर्चासाठी ३.३० लाख रुपये, अशा प्रकारे प्रति केंद्र २३.३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून दोन्ही केंद्रांसाठी एकूण ४६.६० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र रेडीच्या जवळ विशेष आयुष केंद्र बांधण्यासाठी १० गुंठे जागा उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे. या जागेत विशेष आयुष केंद्र स्थापन करून पंचकर्म व इतर आयुष सेवा पुरवणे प्रस्तावित आहे. या केंद्राच्या बांधकामासाठी ७५ लाख रुपये आणि औषधे, आहारासह इतर आवर्ती खर्चासाठी ५.२० लाख रुपये, असा एकूण ८०.२० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रितेश शंकर राऊळ यांनी आमदार केसरकर यांच्याकडे निवेदन देऊन या कामाचा पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. या मागणीला जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या २३ एप्रिल २०२६ रोजीच्या सभेतील ठराव क्र. ०८, तसेच रेडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे १९ मे रोजीचे पत्र आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांनी १९ मे रोजी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, मुंबई यांच्याकडे पाठविलेल्या परिपूर्ण प्रस्तावांचा मजबूत संदर्भ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राचा विकास साधणाऱ्या या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आपल्या स्तरावरून तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.