RAIGAD : २४ तासांत शितोळेवाडी खून प्रकरणाचा उलगडा; क्रशरवरील दोन मजूर अटकेत

 

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शितोळेवाडी येथे घडलेल्या खून प्रकरणाचा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. अंबी जाधव यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही क्रशरवर काम करणारे मजूर असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या शितोळेवाडी जंगल परिसरात ८ जून रोजी अंबी जाधव यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विविध पथके तयार केली.

 

घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. तपासादरम्यान मुंगोशी येथील क्रशरवर काम करणारे रामअवतार उर्फ शेरा केवत आणि सुनील विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही आरोपी मूळचे मध्यप्रदेशातील असून सध्या मुंगोशी येथे वास्तव्यास होते.

 

पोलिस तपासात अंबी जाधव यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या २४ तासांत या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत असून, त्यांना पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.