अल निनो व हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाकृषी अभियानांतर्गत चाफेड येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
शिरगाव (प्रतिनिधी) : शाश्वत व स्वयंपूर्ण शेती विकासासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. शुद्ध व सकस अन्न उत्पादनासाठी शेतीतील गुणवत्ता वृद्धीला प्राधान्य देतानाच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, गोमूत्र यांसारख्या सेंद्रिय घटकांचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने नैसर्गिक व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करून शेती अधिक सक्षम आणि किफायतशीर बनवावी, असे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ डॉ. भास्करराव काजरेकर यांनी चाफेड येथे केले.
आगामी खरीप हंगाम २०२६ मध्ये अल निनो आणि हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून कृषी विभाग देवगड व कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने चाफेड येथे महाकृषी अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पीक उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमात गोकृपा अमृत, दशपर्णी अर्क, जीवामृत, बायोचार निर्मिती, जैविक आच्छादन, काजू-आंबा पीक व्यवस्थापन तसेच भात बियाणे प्रक्रिया व उगवण क्षमता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच विविध तंत्रज्ञानांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. अल निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम, त्यावरील उपाययोजना, माती परीक्षणाचे महत्त्व आणि नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रांचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव काजरेकर, चाफेड सरपंच साहिल पांचाळ, ग्राम पंचायत सदस्य सुनिल कांडर, शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूराव लांबाडे, बीटीएम निकेतन राणे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोडेकर उपस्थित होते. याशिवाय गावातील शेतकरी बांधव आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती गटाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












