गोव्यातील एका भक्ताचे श्रद्धा आणि भक्तीचे एक उत्तम उदाहरण…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर दीड किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला भव्य कळस प्रतिष्ठापित केला आहे. गोव्यातील एका अज्ञात भक्ताने अत्यंत श्रद्धेने आणि गुप्तता राखत ही अनमोल भेट देवीच्या चरणी अर्पण केली आहे.
या दानाची माहिती समोर आल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात या देणगीची चर्चा सुरू झाली आहे. मंदिराच्या इतिहासात ही एक अत्यंत महत्त्वाची आणि विशेष घटना मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिरासाठी तयार करण्यात आलेला हा कळस सुमारे साडेतेरा फूट उंच असून त्याच्या निर्मितीसाठी जवळपास दीड किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. कळसाची रचना पारंपरिक मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार करण्यात आली असून त्यात धार्मिक आणि कलात्मक सौंदर्याचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.
सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याच्या कळसाची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही देणगी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे
विशेष म्हणजे ही देणगी देणाऱ्या गोव्यातील भाविकाने आपली ओळख जाहीर होऊ दिलेली नाही. धार्मिक कार्य करताना प्रसिद्धीपेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर प्रशासनालाही या भक्ताने अत्यंत गोपनीयतेने संपर्क साधत कळस अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
भाविकाच्या या कृतीमुळे अनेक भक्त प्रभावित झाले असून श्रद्धा आणि भक्तीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.











