युवकांचा रोजगार महत्त्वाचा त्यामुळे पुढील कार्यवाहीबाबत वरिष्ठांचा सल्ला घेणार
यापुढे राजघराण्यावर टीका केल्यास मानहानीचा दावा करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी :‘ग्रो बीग टेक्नॉलॉजी’ ही कोणतीही सामाजिक संस्था नसून ती एक खासगी संस्था आहे. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवणे हे आमचे कर्तव्य असल्यानेच त्यांना नियमानुसार भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, या संस्थेने केवळ १५ दिवसांचे भाडे भरून तब्बल दीड महिना जागेचा वापर केला आहे. इतकेच नव्हे तर, केवळ एका रूमची मागणी करून प्रत्यक्षात तीन रूम वापरल्या आहेत. या सर्व बाबींवर बोट ठेवले म्हणून मायकल डिसोजा हे नगराध्यक्षा म्हणून माझ्यावर टीका न करता थेट सावंतवाडी राजघराण्यावर नाहक आरोप करत आहेत, ही बाब अत्यंत अयोग्य असून या प्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा आमचा विचार आहे, असा जोरदार पलटवार सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेला सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, माझ्यावर नेहमीच विविध आरोप केले जातात, मात्र आम्ही प्रत्येक वेळी त्या आरोपांना उत्तरे देत बसत नाही. लोकांची कामे करणे आणि सावंतवाडीचा विकास करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिमखाना येथील इमारतीत सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालय असल्याने, तिथे काही चांगल्या गोष्टी करण्याच्या हेतूने आम्ही भेट दिली होती. तसेच मुंबई विद्यापीठ आणि ग्रो बीग टेक्नॉलॉजी यांच्याकडून चालणारे कामकाज पाहण्यासाठी आम्ही गेलो असता, तिथे काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
या संस्थेला १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये भाडे आणि ९ हजार रुपये जीएसटी अशा दराने जागा देण्यात आली होती. यासंदर्भात काउन्सिलची बैठकही होणार होती. आज दीड महिना झाला तरीही ही कंपनी तिथेच ठाण मांडून आहे. परवानगी एका रूमची असताना तीन रूम वापरल्या जात आहेत. याबद्दल जेव्हा प्रशासनाने विचारणा केली, तेव्हा त्यांच्याकडून खोटी माहिती देण्यात आली. तिसऱ्या रूममध्ये त्यांची मुले जेवत होती, तर बाथरूम वापरण्याचा कोणताही विषय नव्हता. या सर्व गोष्टींबाबत त्यांनी प्रशासनाशी बोलणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. नगरपरिषदेच्या इमारतीचा वापर कशासाठी आणि कसा होतोय, यावर लक्ष ठेवणे ही नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी पार पाडत असल्यानेच ते आता माझ्या कुटुंबावर आणि राजघराण्यावर वैयक्तिक टीका करत आहेत, असा स्पष्ट आरोप नगराध्यक्षांनी केला.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी कोणावरही वैयक्तिक बोलणार नाही. नगरपरिषदेच्या इमारतीत काय चालते यावर माझे पूर्ण लक्ष आहे. ही कोणतीही सामाजिक संस्था नाही, ती नफा कमवणारी खासगी कंपनी आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी हाच आमचा हेतू आहे. काही लोक टाळं ठोकल्याचा आरोप करत आहेत, मात्र तिथली दारे काचेची आहेत, त्यामुळे तसा काही प्रश्नच उद्भवत नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहोत. आजवर अनेकांनी आमच्यावर आरोप केले, पण त्यात जर थोडी जरी सत्यता असेल, तर त्यांनी पुरावे जाहीर करावेत, असे थेट आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
भाड्याच्या कराराबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, संस्थेने १५ दिवसांसाठी रूम मागितली होती आणि तसा करारही झाला होता. प्रशासनाने ५० हजार भाडे व ९ हजार जीएसटी ठरवला होता. आज दीड महिना उलटून गेला तरी त्यांनी उर्वरित १ महिन्याचे भाडे दिलेले नाही. केवळ १५ दिवसांचेच भाडे भरले आहे. स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल या अपेक्षेने प्रशासनाने त्यांना ही जागा भाड्याने दिली होती. मुंबई विद्यापीठाचे केंद्र मी नगराध्यक्ष होण्यापूर्वीच आले होते आणि त्याबाबतचे निर्णय वरिष्ठांनी घेतले होते. माझा मुख्य हेतू पालिकेचे उत्पन्न वाढवणे हाच आहे, आणि या संदर्भात आम्ही लवकरच ठराव करून पुढील भूमिका स्पष्ट करू.
शहरातील विकासकामांचा उल्लेख करत नगराध्यक्षा म्हणाल्या की, सावंतवाडी शहरात विकासकामे करताना काही तांत्रिक अडचणी येतात, मात्र आमची संपूर्ण टीम सज्ज असून लोकांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे विरोधकांकडून होणारी टीका ही पूर्णपणे नाहक आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत विरोधक बोलत आहेत, परंतु त्या संदर्भात मुंबईत अनेक महत्त्वपूर्ण बैठका झाल्या आहेत. सावंतवाडीच्या राजघराण्याने शहराच्या विकासासाठी आजवर अनेक जागा विनामूल्य दिल्या आहेत. मी नगराध्यक्ष पदावर कार्यरत असल्याने विरोधकांनी माझ्या कामावर खुशाल टीका करावी; मात्र माझ्या कुटुंबाला आणि राजघराण्याला यात का ओढले जात आहे? त्यामुळेच आता आम्ही कायदेशीर पाऊल उचलत मानहानीचा दावा दाखल करण्याचा गंभीर विचार करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.












