संगमेश्वरमध्ये इंजिनिअर तरुणाची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

देवरूख (प्रतिनिधी):

बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन माध्यमाचा वापर करून संगमेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणाला तब्बल २ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नावडी-संगमेश्वर येथील रहिवासी असलेले ३५ वर्षीय शशांक प्रकाश सावंत हे पेशाने इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. ३० मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारला. आरोपीने सावंत यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा संगमेश्वर या खात्यामधून अनुक्रमे ९५,००० रुपये आणि ८०,००० रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. एवढ्या मोठ्या रक्कमेवरच न थांबता, भामट्याने त्यांच्या जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, शाखा संगमेश्वर या दुसऱ्या खात्यालाही लक्ष्य करत त्यामधून ५०,००० रुपये लंपास केले. अशा प्रकारे दोन्ही बँकांच्या खात्यांमधून एकूण २ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन रक्कम काढून घेत सावंत यांची फसवणूक करण्यात आली.

आपल्या खात्यातून परस्पर पैसे वळवले गेल्याचे लक्षात येताच शशांक सावंत यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी १२ जून २०२६ रोजी रात्री १९.४७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, नागरिकांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील, ओटीपी किंवा कोणतीही गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.