मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाची राहील; ग्रामस्थांचा इशारा
देवरूख (प्रतिनिधी)
संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान परिसरात सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि तीव्र सुरुंग स्फोटांमुळे मार्लेश्वर गुहेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या स्फोटांच्या तीव्र हादऱ्यांमुळे गुहेचा भाग कोसळू लागला असून, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मार्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी सध्या नदीपात्रात फूट ब्रिजचे काम सुरू आहे.या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत बेजबाबदारपणे तीव्र स्वरूपाचे सुरुंग स्फोट घडवून आणले जात आहेत. मंदिराच्या पायऱ्यांजवळ अवघ्या १०० मीटर अंतरावर होत असलेल्या या स्फोटांमुळे सह्याद्रीच्या संवेदनशील डोंगररांगांना आणि गुहेला मोठे हादरे बसत आहेत. या सततच्या स्फोटांमुळे गुहेच्या छताला आणि परिसरातील दगडांना मोठे तडे गेले असून,दगड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात दगड कोसळून एक महिला भाविक जखमी झाली होती. याआधी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशीही अशाच प्रकारे स्फोटांच्या हादऱ्यामुळे दगड पडून एक भाविक गंभीर जखमी झाला होता. केवळ गुहाच नव्हे, तर मंदिर परिसरातील इतर बांधकामांनाही या हादऱ्यांमुळे तडे गेले आहेत.
या गंभीर प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना वारंवार सूचित करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.”या स्फोटांना प्रशासनाने परवानगी दिलीच कशी?” असा संतप्त सवाल पुजारी योगेश लिंगायत, विजय लिंगायत, प्रसाद सावंत, विनायक सावंत आणि बाळकृष्ण ब्रीद यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन हे स्फोट तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूला इजा पोहोचल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.











